मुंबई ः वीस कोटींच्या हायड्रोपोनिक गांजा तस्करीचा पर्दाफाश करुन सीमा शुल्क विभागाने तीन प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. ते तिघेही बॅकाँक आणि हाँगकाँगहून हा गांजा घेऊन आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्यांना किल्ला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही महिन्यांत विदेशातून हायड्रोपोनिक गांजाच्या तस्करीत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. सोमवारी हाँगकाँगहून दोन प्रवाशी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. त्यांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या सामानाच्या झडतीत या अधिकाऱ्यांना 7 किलो 864 ग्रॅम वजनाच्या हाड्रोपोनिक गांजाचा साठा सापडला.
त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात 7 कोटी 86 लाख रुपये किंमत आहेत. ते दोघेही चेक इन ट्रॉली बॅगेत हा गांजा घेऊन आले होते. ही कारवाई ताजी असताना बँकाँकहून आलेल्या अन्य एका प्रवाशाला या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्याच्याकडून सामानातून या अधिकाऱ्यांनी 11 किलो 922 ग्रॅम वजनाचा हायड्रोनिक गांजा जप्त केला. त्याची किंमत 11 कोटी 92 लाख रुपये आहे.
विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल
जप्त गांजा त्यांना हाँगकाँग आणि बँकाँक येथून एका व्यक्तीने दिला होता. या गांजाच्या डिलीव्हरीसाठी त्यांना काही रकमेचे कमिशन आणि विमान तिकिट देण्यात आले होते. मात्र मुंबईतील संबंधित व्यक्तीला हा गांजा देण्यापूर्वीच या तिघांनाही सीमा शुल्क विभागाने अअटक केली. गांजाचा साठा जप्त करुन तिन्ही प्रवाशांविरुद्ध या अधिकाऱ्यांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.