11th Class Admission Issue
मुंबई : राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेची सुरुवात यंदाही गोंधळातच झाली. शिक्षण विभागाकडून दोन दिवस सराव अर्जासाठी संकेतस्थळ खुले ठेवण्यात आले होते. मात्र बुधवारी, प्रत्यक्ष अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी, संकेतस्थळ तांत्रिक बिघाडामुळे पूर्णतः ठप्प झाले, सकाळपासूनच विद्यार्थी व पालकांनी अर्ज भरण्यासाठी प्रयत्न सुरू केले असताना, ५०२ बंड गेटवे' व 'संकेतस्थळाचे काम सुरू आहे' असे संदेश दिसू लागले, यामुळे अकरावी प्रवेशाचे बारा वाजलेले पहायला मिळाले.
राज्यात दहावी उत्तीर्ण झालेल्या सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश ऑनलाईन प्रक्रियेद्वारे होणार आहेत. मात्र प्रत्यक्ष अर्ज प्रक्रियेच्या दिवशी संकेतस्थळच ठप्प झाल्यामुळे विद्यार्थ्यांना नोंदणी व पसंतीक्रम नोंदविता आले नाही. दिवसभर हे संकेतस्थळ ठप्पच राहिल्याने हजारी विद्याथ्यांना आणि त्यांच्या पालकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागला.
कोणत्याही हेल्पलाईनवर प्रतिसाद मिळत नव्हता. परिणामी, विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. शिक्षण संचालनालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यावर संकेतस्थळ दुपारपर्यंत सुरळीत होईल, असे सांगण्यात आलेः मात्र सायंकाळपर्यंतही परिस्थितीत फारसा बदल झाला नाही.
शिक्षण संचालनालयाने सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मे रोजी दुपारी ३ वाजता अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. तांत्रिक त्रुटी दूर करून ते अधिक सुलभ व त्रुटीरहित स्वरूपात पुन्हा सुरू करण्यात येईल, विद्यार्थी व पालकांनी गोंधळून न जाता संयम ठेवावा, असे आवाहनही डॉ. पालकर यांनी केले. अर्ज भरण्यासाठी पुरेसा वेळ, आवश्यक मार्गदर्शन आणि सुविधा देण्यात येतील. दरम्यान, संकेतस्थळ कार्यान्वित झाल्यानंतर अर्ज नोंदणीसाठीची वेळ संकेतस्थळावर तसेच विद्यार्थ्यांच्या ई-मेल व मोबाईलवर संदेशाने कळवण्यात येणार आहे. संकेतस्थळ पूर्णपणे कार्यक्षम करूनच सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. पालकर यांनी सांगितले.
अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर अर्ज भरण्याची सुरुवात विलंबाने झाली असली तरी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास व पसंतीक्रम नोंदविण्यास पुरेसा कालावधी देण्यात येईल. तांत्रिक अडचणी दुरुस्त केल्यानंतर प्रवेशाचे संकेतस्थळ परिपूर्ण व उत्कृष्ट स्वरुपात उपलब्ध होईल. संकेतस्थळावर कोणतीही छोट्यात छोटी त्रुटी राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना अर्ज भरणे सोईचे व सुलभ व्हावे व एकंदर प्रवेशाची कार्यवाही कमीत कमी वेळात पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत, विद्यार्थी व पालकांनी गोंधळून जाऊ नये, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले.
राज्यात यंदा सर्वच विद्याथ्यांचे प्रवेश ऑनलाईन होणार आहेत. त्यासाठी १०० रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांकडून नोंदणी फी म्हणून घेतले जात आहेत. सरकारने करोडो रुपये कमवण्याच्या नादात, गरीब होतकरू विद्याध्यांवर अन्याय करू नये. शिक्षकांवर व कनिष्ठ महाविद्यालयावर ऑनलाईन प्रवेशाची सक्ती करून प्रत्येक वर्षी सुरळीत चालू असलेले काम आता नवीन ऑनलाईन पॉलिसीचे धोरणे लावून बिघडवू नये व कनिष्ठ महाविद्यालय बंद पाडू नये.महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष, राज्य मुख्याध्यापक संघटना