

नाशिक : बेकायदेशीर शिक्षक समायोजनासह अनागोंदी कारभारामुळे थेट विधिमंडळात गाजलेल्या महापालिकेच्या शिक्षण विभागाची झाडाझडती बुधवारी (दि.१६) राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून घेतली जाणार आहे.
महापालिका मुख्यालयातील स्थायी समितीच्या दालनात दुपारी १२ वाजता यासंदर्भात बैठक होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याच्या नियोजनाचा भाग म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे कारण दिले जात असले तरी या माध्यमातून शिक्षण विभागातील गैरकारभाराला अंकुश लावण्याचा प्रयत्न शिक्षणमंत्र्यांकडून केला जाणार आहे.
शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागातील गैरकारभाराचा भंडाफोड लक्षवेधी सूचनेद्वारे विधिमंडळ अधिवेशनात केला. तत्कालीन शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी जिल्हा परिषद तसेच अन्य विभागांतील ५४ शिक्षकांचे नाशिक महापालिकेच्या शाळांमध्ये बेकायदेशीररीत्या समायोजन केले. शिक्षक समायोजन करताना बिंदूनामावलीही डावलली गेली. केंद्रप्रमुखांच्याही नियमबाह्य नियुक्त्या केल्या. पद रिक्त नसताना तिघा शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती दिली गेली. या प्रकरणाच्या चौकशीचे तसेच पाटील यांच्या बदलीचे आदेश शासनाने दिल्यानंतर महापालिकेने अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितामार्फत चौकशी करून अहवाल शासनास सादर केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या शंभर दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमाचे निमित्त साधून शालेय शिक्षणमंत्री भुसे महापालिकेत शिक्षण विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेणार आहे.
शाळांमधील पायाभूत सुविधांचा विकास, प्रधानमंत्री पोषण शक्ती कार्यक्रम, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना, पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती, आधार पडताळणी, शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व त्यांना दिले जाणारे हेल्थ कार्ड, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम आढावा, शिक्षक भरतीसंदर्भातील पवित्र पोर्टल, शिक्षक समायोजन, शिक्षक पालक मेळावा आयोजन, महापालिकेची स्मार्ट स्कूल मोहीम, महापालिका क्षेत्रात विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठीच्या उपाययोजना शिक्षक संस्था तसेच अधिकाऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या योजनांचा आढावा शिक्षणमंत्री भुसे घेणार आहेत.