मुंबई : मुंबईची ग्रामदेवता श्री मुंबादेवी मंदिरात गुढी पाडवा चैत्र नवरात्र उत्सव आज गुरुवारपासून (दि.19) सुरू होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा उत्सव 27 मार्चपर्यंत असणार आहे. उत्सव काळात मंदिर रोज सकाळी साडेपाच ते रात्री 10 वा.पर्यंत असे 16 तास भाविकांसाठी खुले राहणार असल्याची माहिती श्री. मुंबादेवी मंदिर विश्वस्त निधी हेमंत पु.जाधव यांनी दिली.
गुरुवारी सकाळी 7 ते 8 यावेळेत घटस्थापना होणार आहे. त्यानंतर सोमवारी (दि.23) सायंकाळी 6 वा मंदिरात दीपोत्सव तर 26 मार्चला दुर्गाष्टमी व दुसऱ्या दिवशी 27 ला श्री रामनवमी हवन -श्री नवचंडी महायज्ञ पहाटे साडेतीन वाजता प्रारंभ होणार असून पुर्णाहुती सकाळी 8 ते 8.30 वा. यावेळेत होईल.
दिवसभरात मंगला आरतीसह मुख्य आरती, नैवेद्य, धुप व शयन अशा विविध आरत्या होणार आहेत. मंदिराच्या शिखरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्तासह सुरक्षारक्षक कार्यरत राहणार आहेत.