मुंबई: मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकावर वातानुकूलीत लोकलमध्ये सोमवार सकाळी गर्दीच्या वेळी एसी यंत्रणेत मोठा बिघाड झाला. अचानक बंद पडलेल्या एसीमुळे काही प्रवाशांचा अक्षरशः श्वास कोंडला. भर गर्दीतून डब्यातून बाहेर पडणे त्यांना कठीण झाले. अशात तीन प्रवासी बेशुद्ध पडले.
एका प्रवाशाला रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेने मुलुंड स्थानकावर प्रचंड गर्दी उसळली होती. बिघाडामुळे लोकल १६ मिनिटे उशिरा होती. त्यामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
या घटनेचे व्हिडिओ वाऱ्यासारखे व्हायरल झाल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली होती. दरम्यान, वातानुकूलित डब्यातील एसी आणि पर्यायी तांत्रिकी यंत्रणेत एकाच वेळी बिघाड झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
टिटवाळाहून सीएसएमटीकडे निघालेल्या वातानुकूलीत लोकलमध्ये सकाळी ९ वाजून ३८ वाजता अचानक एसी बंद पडला. त्यामुळे डब्यात प्रचंड उकाडा निर्माण झाला. डब्यात हवाच येत नसल्याने अनेक प्रवाशांना गुदमरल्यासारखे वाटू लागले.
अशात काही प्रवासी बेशुद्ध पडल्याने डब्यात एकच गोंधळ उडाला. डब्यातील इतर सहप्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ मदत करत त्यांना बाहेर काढले. बेशुद्ध पडलेल्या प्रवाशांना स्थानकातील प्रवाशांनी हाताने वारा घालत आणि डोळ्यावर पाणी मारत शुद्धीवर आणले. यामध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश होता.
पुरुष प्रवाशांना श्वास घेण्यास जास्तच त्रास होऊ लागल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सर्व गोंधळात मुलुंड स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. २ वर ही एसी लोकल जवळपास १६ मिनिटे उभी होती. त्यावेळी कामावर निघालेल्या नोकरदारांचे प्रचंड हाल झाले.
टिटवाळाहून सुटलेली लोकल सीएसएमटी येथे जाणार होती. मात्र, एसी बंद असल्याने ही लोकल पुढे दरवाजे उघडे ठेवून चालविण्यात आली. कुर्ला स्थानक येताच सर्व प्रवाशांना उतरविण्यात आले. आणि लोकल कुर्ला कारशेडमध्ये दुरुस्तीसाठी पाठवण्यात आली. या एसी गाडी ऐवजी दुसरी साधी लोकल चालविण्यात आली.
दोन्ही महिला प्रवासी थोड्या वेळाने शुद्धीवर आल्या. त्यांची तब्बेत चांगली होऊन त्यांनी पुढील प्रवास केला. तर एका पुरुष प्रवाशाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यालाही बरे वाटत असल्याने ११.३० वाजता रुग्णालयातून सोडण्यात आले. लोकलमध्ये एसी का बंद पडला? तसेच त्याला पर्यायी यंत्रणा सुद्धा का उपयोगात आल्या नाहीत, याची चौकशी करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले.
डब्यातील पर्यायी यंत्रणा सुद्धा कुचकामी
एखाद्या धावत्या वातानुकूलीत लोकलमध्ये एसी बंद पडला तर ताबडतोब डब्यातील दुसऱ्या एसी मधून त्याला ट्रान्सफर मिळण्याची तांत्रिक व्यवस्था असते. मात्र टिटवाळाहून निघालेल्या या लोकलमध्ये इतर दोन्ही एसीमधून तसे ट्रांसफर मिळाले नाही.
शिवाय रेल्वेच्या यांत्रिकी विभाग कर्मचाऱ्यांकडून स्थानकावर सुद्धा एसीचे पर्यायी बटन सुरू करता आले नाही. त्यामुळे या बिघाड झालेल्या एसी लोकलमधील पर्यायी यंत्रणा सुद्धा कुचकामी ठरली आहे. रेल्वेची ही परिस्थिती पाहता एसी लोकल डब्यामधील प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.