MPSC Question Paper Leak Case pudhari photo
मुंबई

MPSC Question Paper Leak Case : एमपीएससी पेपरफुटीप्रकरणी सहायक कक्ष अधिकाऱ्याला अटक

विशेष तपास पथकाने नवी मुंबईतून घेतले ताब्यात; आरोपींची संख्या १३ वर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील प्रश्नसंच फुटीप्रकरणी विशेष तपास पथकाने आणखी एका सहायक कक्ष अधिकाऱ्याला अटक केली आहे. रोहित कोलटक्के असे त्याचे नाव असून, त्याला शुक्रवारी नवी मुंबईतून अटक करण्यात आली.

यापूर्वी या प्रकरणात उमेदवारांना गैरमार्गाने प्रश्नसंच मिळवून देणारा मध्यस्थ मयूर ठाकरे यालाही अटक करण्यात आली होती. या दोघांच्या अटकेमुळे प्रकरणातील अटक आरोपींची संख्या १३ झाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब संवर्गातील १५४ पदांसाठी २२ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्रातील सहा परीक्षा केंद्रांवर चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या प्रश्नसंचाची गोपनीयता भंग करून आर्थिक फायद्यासाठी प्रश्नसंचाची अनधिकृत देवाणघेवाण करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक मंगेश देसाई यांच्या फिर्यादीवरून २५ ऑगस्ट २०२६ रोजी कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

गोपनीय कक्षातून प्रश्नसंच बाहेर

तपासात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गोपनीय कक्षातून तज्ज्ञांनी निवड केलेल्या प्रश्नसंचाच्या प्रती तयार करून त्या आर्थिक फायद्यासाठी अनधिकृतरीत्या बाहेर काढण्यात आल्याचे समोर आले. या प्रकरणात आयोगातील अधिकारी, खासगी अकादमीचा संचालक, मध्यस्थ आणि प्रश्नसंच मिळवून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा सहभाग असल्याचा आरोप आहे.

यापूर्वी आयोगातील अवर सचिव अभिजीत लेंडवे, सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते आणि गोपाळ मराठे, कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील, तसेच मध्यस्थ अमृत पाटील, लोकेश ऊर्फ गौरव पाटील, संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम यांना अटक करण्यात आली होती. प्रश्नसंच मिळवून परीक्षा देणारे ऋतुजा पाटील, साजिद संदे आणि विजय किंगर यांनाही अटक झाली आहे.

या प्रकरणात प्रश्नसंचाची गोपनीयता कशा प्रकारे भंग झाली, त्याच्या प्रती कोणी तयार केल्या, त्या आयोगाबाहेर कशा पोहोचल्या आणि त्यासाठी आर्थिक व्यवहार झाले का, या बाबींचा तपास सुरू आहे.

मध्यस्थ मयूर ठाकरेलाही अटक

प्रश्नसंच गैरमार्गाने उमेदवारांना मिळवून देणारा मध्यस्थ मयूर ठाकरे याला १२ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर अभिजीत लेंडवे याच्याकडून प्रश्नसंच प्राप्त केल्याच्या आरोपावरून आयोगातील सहायक कक्ष अधिकारी रोहित कोलटक्के याला अटक करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT