मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक (गट-ब) पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
अटक करण्यात आलेला एमपीएससीचा सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे हा कौटिल्य क्लासेसचा माजी विद्यार्थी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या क्लासेसचे संचालक प्रवीण पाटील हेही या प्रकरणातील आरोपी आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार , मराठे आणि प्रवीण पाटील यांच्यात नियमित संपर्क होता. दोघेही एकाच गावातील असल्याचेही तपासात समोर आले आहे.
प्रश्नपत्रिका पोहोचवण्यात मराठेची भूमिका?
मराठेने प्रश्नपत्रिका प्रवीण पाटीलपर्यंत पोहोचविण्यात मदत केली का, याचा तपास सुरू आहे. तसेच पाटीलकडून पैसे घेऊन ते एमपीएससीतील अन्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात मराठेचा सहभाग होता का, याचाही तपास केला जात आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, एमपीएससीच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेला २९४ प्रश्नांचा संच आरोपींच्या ताब्यात गेला होता. त्यातील ७७ प्रश्न २२ मार्चच्या औषध निरीक्षक परीक्षेत त्याच उत्तर पर्यायांसह आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे परीक्षेपूर्वीच गोपनीय प्रश्नसंच बाहेर गेल्याचा संशय बळावला आहे.
अधिकाऱ्यांची साखळी
गुन्हे शाखेच्या तपासानुसार, एमपीएससीचे सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकटे यांना तज्ज्ञांनी तयार केलेल्या प्रश्नांपर्यंत प्रवेश होता. पोलिसांच्या आरोपानुसार, त्यांनी २९४ प्रश्नांचा स्वतंत्र संच तयार करून तो एमपीएससीचे उपसचिव अभिजित लेंडवे यांच्याकडे दिला. त्यानंतर हा संच गोपाळ मराठेकडे गेला आणि मराठेने तो प्रवीण पाटीलपर्यंत पोहोचवल्याचा पोलिसांना संशय आहे.
प्रश्नपत्रिका पुढे प्रवीण पाटील, अमृत पाटील आणि अन्य आरोपींपर्यंत पोहोचल्याचा पोलिसांचा दावा आहे. २६ ऑगस्टला या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली असून, त्यात तीन एमपीएससी अधिकारी आणि कौटिल्य क्लासेसचे संचालक प्रवीण पाटील यांचा समावेश आहे. आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत.
इतर परीक्षांचे पेपरही फुटले?
प्रवीण पाटीलने गोपाळ मराठेच्या माध्यमातून अन्य स्पर्धा परीक्षांचे प्रश्नपत्रिका मिळविण्याचा किंवा फुटविण्याचा प्रयत्न केला होता का, याचाही तपास गुन्हे शाखा करत आहे. त्यामुळे तपासाचा आवाका केवळ औषध निरीक्षक परीक्षेपुरता मर्यादित राहणार की अन्य परीक्षांपर्यंत पोहोचणार, याकडे लक्ष लागले आहे.