

कुर्ला: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तसेच महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यालयात पीआरओ म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा रविवारी रात्री भांडुप परिसरात मृत्यू झाला. याबाबत भांडुप पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अद्यापतरी त्यांच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही.
आशिष मेटे असे या मयत कर्मचाऱ्याचे नाव असून ते अदिती तटकरे यांच्या कार्यालयात समाज माध्यम सांभाळण्याचे काम करत होते. मरील लाईन परिसरात त्यांचे कार्यालय असल्याने त्यांच्या एका महिला सहकाऱ्यासोबत ते रविवारी या कार्यालयात आले होते.
त्यानंतर ते महिला सहकारी यांच्या भांडुप येथील घरी गेले होते. याठिकाणी रात्री जेवण आटोपल्यानंतर त्यांना पित्ताचा काही त्रास होऊ लागला. त्यामुळे काही वेळ इमारतीखाली चालण्यास जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. याठिकाणी चालत असताना अचानक तोल जाऊन ते इमारतीच्या खाली कोसळलेले.
इमारतीच्या सुरक्षारक्षकाने तत्काळ याची माहिती मेटे यांच्या सहकारी महिला यांना दिली. त्यांनी तत्काळ खाली येऊन त्यांना प्रथम एका खासगी रुग्णालयात दाखल केले.
मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. आद्यप तरी त्यांच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.