MPSC Drug Inspector Exam  Pudhari
मुंबई

MPSC Drug Inspector Exam : औषध निरीक्षक भरती परीक्षा पेपरफुटीचा आरोप, १०० पैकी ९० प्रश्न व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याचा दावा

आयोगाने सर्व आरोप फेटाळले, आरोप निराधार निघाल्‍यास बदनामी प्रकरणी कायदेशीर कारवाईचाही इशारा

पुढारी वृत्तसेवा

MPSC Drug Inspector Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक (Food and Drug Administration) भरती परीक्षेवर पेपरफुटीचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. २२ मार्च रोजी पार पडलेल्या या परीक्षेतील तब्बल ९० प्रश्न दोन दिवस आधीच, म्हणजेच २० मार्च रोजी व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याचा खळबळजनक दावा एका उमेदवाराने केला आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने तक्रारदाराचा जबाब नोंदवून पुरावे ताब्यात घेतले असून, पुढील कारवाईसाठी प्रकरण आयोगाकडे वर्ग केले आहे. तर दुसरीकडे, एमपीएससीने प्राथमिक स्तरावर हे आरोप फेटाळले असले तरी प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.

परीक्षार्थीने केली तक्रार दाखल

गौरव पाटील या परीक्षार्थीने याप्रकरणी ईमेलद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) अधिकृत तक्रार दाखल केली आहे. १०० पैकी ९० प्रश्न परीक्षेपूर्वीच व्हॉट्सअॅपवर फिरत होते, असा दावा गौरव पाटील याने केला आहे. सुरुवातीला लोकसेवा आयोगाकडे तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही, असा आरोपही त्याने केला आहे.

प्रकरण पुढील चौकशीसाठी प्रकरण आयोगाकडे

तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने २४ जुलै रोजी गौरव पाटील यांना बोलावून त्यांचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला. तसेच त्यांच्याकडे असलेले व्हॉट्सअॅप चॅट आणि इतर पुरावे ताब्यात घेतले आहेत. हे सर्व पुरावे आणि प्रकरण पुढील चौकशीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्व आरोप फेटाळले

पेपरफुटीच्या या दाव्यांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपली बाजू स्पष्ट केली आहे. २२ मार्च रोजी परीक्षा पार पडली, त्यावेळी अशी कोणतीही तक्रार आलेली नव्हती. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.प्राप्त तक्रारीच्या आधारे चौकशी सुरू करण्यात आली असून, चौकशीत तथ्य आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

...तर बदनामी प्रकरणी कायदेशीर कारवाई करणार : आयोगाचा इशारा

संबंधित तक्रारीच्‍या चौकशीत तथ्य आढळले नाही आणि केवळ बदनामी करण्याच्या हेतूने आरोप केले गेल्याचे निष्पन्न झाल्यास, आयोगाची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT