Rajya Sabha Election BJP
राज्यसभेत विधेयक मंजूर करायचे तर भाजप-एनडीएला वायएसआर काँग्रेस, अण्णा द्रमुक पक्ष यांचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे.  File Photo
मुंबई

राज्यसभेतील रिक्त जागांसाठी भाजपकडून हालचाली

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : राज्यसभेत विधेयक मंजूर करायचे तर भाजप-एनडीएला वायएसआर काँग्रेस, अण्णा द्रमुक पक्ष यांचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे. तसेच राज्यसभेतील रिक्त जागा लवकरात लवकर भरण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. महाराष्ट्रातील 2 खासदारांसह देशभरातून राज्यसभेच्या रिक्त असलेल्या 19 जागांवर लवकरच निवडीची प्रक्रिया होईल, अशी शक्यता त्यामुळे वर्तविली जाते.

लोकसभेच्या निकालात स्वबळावरचे बहुमत गमावल्यानंतर राज्यसभेतही भाजपच्या खासदारांची संख्या कमी झाली आहे. 13 जुलै रोजी राज्यसभेच्या 4 खासदारांचा कार्यकाळ संपला, त्यामुळे भाजपच्या खासदारांची संख्या राज्यसभेत 86 वर येऊन पोहोचली आहे, तर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) एकूण खासदारांची राज्यसभेतील संख्या 101 आहे. परंतु, हा आकडा राज्यसभेतील बहुमतासाठी पुरेसा नाही.

राज्यसभेत एकूण 250 खासदार असतात, बहुमतासाठी 125 पेक्षा जास्त खासदारांची गरज असते. राज्यसभेतील राकेश सिन्हा, राम शकल, सोनल मानसिंह आणि महेश जेठमलानी या खासदारांचा कार्यकाळ 13 जुलै रोजी संपला. या सर्व खासदारांची नियुक्ती केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी केली होती. त्यामुळे हे सर्व खासदार भाजपला समर्थन देत होते, तर दुसरीकडे भाजपचा जुना सहकारी मित्र राहिलेल्या बिजू जनता दलानेही विरोधी पक्षाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या पक्षाचेही 9 खासदार आता सरकारला पाठिंबा देणार नाहीत. त्यामुळे महत्त्वपूर्ण विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारची राज्यसभेत कसोटी लागणार आहे. यासाठी भाजप आणि रालोआला वायएसआर काँग्रेस, अण्णा द्रमुक पक्ष यांचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे. तसेच राज्यसभेतील रिक्त जागा लवकरात लवकर भरण्याचा भाजपचा प्रयत्न असेल.

8 एनडीएला, तर 3 जागा इंडिया आघाडीला मिळणार

राज्यसभेच्या सध्या रिक्त असलेल्या 19 जागांमध्ये जम्मू-काश्मीरमधील 4 आणि राष्ट्रपती नियुक्त 4 खासदारांचा समावेश आहे, तर आसाम, बिहार आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी 2, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि त्रिपुरामधील प्रत्येकी 1 जागा रिक्त आहे. या राज्यांतील 11 पैकी 10 जागा लोकसभा निवडणुकीमुळे रिक्त झाल्या आहेत. या 11 जागांसाठी जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा त्यातील 8 जागा एनडीएकडे जाऊ शकतात; तर 3 जागा इंडिया आघाडीला जाण्याची शक्यता आहे. सध्या इंडिया आघाडीचे राज्यसभेत एकूण 87 खासदार आहेत. यामध्ये काँग्रेसचे 26, तृणमूल काँग्रेसचे 13, आम आदमी पक्ष आणि द्रमुकचे प्रत्येकी 10 खासदार आहेत.

SCROLL FOR NEXT