नवी मुंबई: १ जूनपासून खोल समुद्रात पावसाळी मासेमारी बंदी घातल्यानंतर मासळीची आवक प्रचंड घटली आहे. परिणामी बाजारात मासळीचे दर चांगलेच वाढले आहेत. बाजारात कापरी पापलेट, घोळ मासा दोन हजारांवर तर सुमरमई आठशे रुपये किलोवर गेली आहे.
१ जूनपासून ३१ जुलैपर्यंत म्हणजे ६१ दिवसांची यावर्षी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बाजारात ताज्या मासळीची उपलब्धता कमी झाल्याने मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत वाढली आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या मासळीचे दर वाढले आहेत.
मासळीला अक्षरशः ‘सोन्याचा भाव‘ आला असल्याचे चित्र नवी मुंबईतील मासळी बाजारात आहे. सध्या वाढलेल्या दरांमुळे खवय्यांचा हिरमोड होत असला, तरी समुद्रातील संपत्ती टिकवण्यासाठी आणि भविष्यात भरघोस मासेमारीसाठी ही बंदी आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.
मासळीचे दर (किलो)
सुरमई: १,८००
कापरी पापलेट: २,२००
पापलेट: १,५००
घोळ: २,०००
हलवा: १,०००
कोळंबी: ८००
बांगडे (सहा नग): ४००