Engineering Diploma Admission: अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी २२ जूनपर्यंत अर्ज करता येणार! आतापर्यंत ८७ हजार अर्ज

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Diploma Admission 2026
Diploma Admission 2026Pudhari
Published on
Updated on

मुंबई: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत सुमारे ८७ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांना २२ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे.

दहावीनंतरच्या केंद्रीभूत पदविका प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २० मे २०२६ पासून सुरू झाली आहे. प्रवेशासाठी उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक असून, त्याने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) अथवा समतुल्य परीक्षा किमान ३५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. दहावीमध्ये तांत्रिक (टेक्निकल) विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी १५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

Diploma Admission 2026
Mumbai University ChatGPT: चॅट जीपीटीच्या मदतीने अभ्यास साहित्य निर्मिती; मुंबई विद्यापीठातील प्रकार

मागील शैक्षणिक वर्षात राज्यात ३४४ अभियांत्रिकी पदविका संस्था कार्यरत होत्या आणि त्यांची एकूण प्रवेश क्षमता १ लाख २२ हजार ३२४ इतकी होती. यंदा या प्रवेश क्षमतेत सुमारे १० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यभरात ३३१ सुविधा केंद्रे (एफसी) स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रांवर विद्यार्थ्यांना अर्ज भरणे, कागदपत्रांचे स्कॅनिंग व अपलोड करणे तसेच अर्ज निश्चित करणे या सर्व सुविधा विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सुविधा केंद्रांची यादी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, ही केंद्रे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत कार्यरत राहणार आहेत.

Diploma Admission 2026
E85 Fuel: केंद्र सरकारने आणले ‘ई ८५’ इंधन; पेट्रोलपेक्षा २० रुपयांनी स्वस्त

प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी https://poly26.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा, असे आवाहन संचालनालयाकडून करण्यात आले आहे.

कॅम्पस प्लेसमेंटमधून विद्यार्थ्यांना नोकऱ्या

दहावीनंतरचा तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना तंत्रज्ञ, अभियंता व उद्योजक होण्याची संधी उपलब्ध करून देतो. औद्योगिक क्षेत्रात या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मोठी मागणी असून, अनेक विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमधूनच महिन्याला १ लाख रुपयांपर्यंत पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अनुरूप ‘के स्कीम’ अभ्यासक्रम राज्यात लागू करण्यात आला असून, त्यामध्ये आऊटकम-बेस्ड क्रेडिट सिस्टिम, मराठी-इंग्रजी द्विभाषिक शिक्षण, सॉफ्ट स्किल्स, आंत्रप्रेन्युअरशिप, एआय, रोबोटिक्स, आयओटी, ड्रोन टेक्नॉलॉजी, क्लाऊड कॉम्प्युटिंग, ईव्ही टेक्नॉलॉजी यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानांचा समावेश करण्यात आला आहे.

तंत्रनिकेतन पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवसापासूनच नोंदणीला जोरदार प्रतिसाद दिला आहे. कमी कालावधीत 88 हजारावर नोंदणीचा टप्पा गाठला आहे. येत्या काळात आणखी नोंदणी होईल.

- डॉ. विनोद मोहितकर, संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news