दिवाळीनंतर मतदान  Shashank Parade
मुंबई

दसऱ्यानंतर आचारसंहिता, दिवाळीनंतर मतदान

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्य विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 12 ऑक्टोबरला आलेला दसरा उत्सव होताच कोणत्याही क्षणी लागू होईल आणि मतदान मात्र दिवाळीनंतर घेतले जाईल, असे स्पष्ट संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या पत्रकार परिषदेतून शनिवारी मिळाले. ही निवडणूक एकाच टप्प्यात घ्या, अशी सर्वपक्षीय मागणी पुढे आली असली, तरी त्याबद्दलचा निर्णय आयोगाने घेतलेला नाही.

विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपते, त्याआधी विधानसभा निवडणूक पार पडून नवी विधानसभा अस्तित्वात येईल, असे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या तारखांबाबत राजकीय पक्षांनी केलेल्या सूचनांचा संदर्भ लक्षात घेता 19 ते 21 नोव्हेंबरदरम्यान विधानसभेचे मतदान घेतले जाऊ शकते. त्यानुसार आचारसंहिता 18 ऑक्टोबरच्या आसपास लागण्याची शक्यता आहे. निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग दोन दिवसांपासून मुंबईत होता. या दौर्‍याचा समारोप करताना झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली.

राज्यातील राजकीय पक्षांनी आयोगासोबत झालेल्या बैठकीत दिवाळी, देव दिवाळी आणि छटपूजा हे सण टाळून निवडणुकीची तारीख निश्चित करावी, अशी विनंती केली आहे, असे राजीव कुमार म्हणाले. मतदानाचा टक्का वाढावा म्हणून शनिवार-रविवार किंवा शासकीय सुट्टीच्या तारखा वगळून आठवड्याच्या मधल्या दिवसात मतदान घ्यावे, जेणेकरून मतदारांना साप्ताहिक सुट्टीला मतदानाची सुट्टी जोडून बाहेर जाता येणार नाही, अशीही विनंती राजकीय पक्षांनी केल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले.

यंदा 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरदरम्यान दिवाळी साजरी होणार असून, 15 नोव्हेंबर रोजी देव दिवाळी आहे. छट महोत्सव 5 ते 8 नोव्हेंबरदरम्यान आहे. हिंदीपट्ट्यात देव दिवाळी आणि छट महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या सणांसाठी गावाकडे जाण्यास मतदार प्राधान्य देतात. हे मतदार आपल्या गावी जाऊन परतण्याचा कालावधी लक्षात घेऊन तारीख ठरविली जाईल, असे दिसते. गेल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने 21 सप्टेंबर 2019 रोजी पत्रकार परिषद घेऊन केली होती. मतदान हे बरोबर एक महिन्याने म्हणजे 21 ऑक्टोबरला, तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी झाली होती. यावेळी नोव्हेंबरच्या तिसर्‍या आठवड्यात मतदान होणार असेल, तर एक महिन्यापूर्वी म्हणजे 18 ते 20 ऑक्टोबरदरम्यान निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. ही पत्रकार परिषद होताच राज्यात आचारसंहिता लागू होईल.

19 ते 21 नोव्हेंबर मतदान होणे शक्य

देव दिवाळीनंतरचा आठवडा सोमवारी, दि. 18 नोव्हेंबरपासून सुरू होतो. सोमवारी वा शुक्रवारी मतदान घेतले तर मतदार शनिवार, रविवारच्या सुट्ट्या जोडून बाहेर पळतात, हा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची विनंती लक्षात घेता आणि राज्यात मत टक्का वाढविण्यासाठी आयोगाचे सुरू असलेले प्रयत्न पाहता मंगळवार, दि. 19 ते गुरुवार, दि. 21 नोव्हेंबर या काळात निवडणूक आयोग मतदान घेऊ शकतो.

टप्प्याबाबत योग्यवेळी निर्णय

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका या एका टप्प्यात घ्याव्यात, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांची आहे; पण याबाबत आपण आताच निर्णय घेऊ शकत नाही. योग्यवेळी त्याबाबत निर्णय घेतला जाईल. निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पाडल्या जातील, याची आम्ही दक्षता घेत असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT