ठाणे : ठाणे विधानसभा हा सध्या भाजपच्या ताब्यात असून, या ठिकाणी संजय केळकर हे विद्यमान आमदार आहेत. मात्र, या मतदार संघावर शिंदेंच्या शिवसेनेकडूनही दावा करण्यात येत आहे. हा मतदार संघ भाजपकडून आपल्याकडे खेचून आणण्यासाठी शिंदे शिवसेनेचे कसून प्रयत्न सुरू आहेत, तर उबाठा पक्षाकडून लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार राजन विचारे यांच्या नावाची चर्चा सध्या आहे. मनसेनेही या मतदार संघावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने काबीज केल्यानंतर आता ठाण्यातील सहा विधानसभा क्षेत्रासाठी महायुतीमध्येच दावे-प्रतिदावे केले जात आहेत. सध्या सहा विधानसभा क्षेत्रापैकी ठाणे, ऐरोली आणि बेलापूर हे मतदार संघ भाजपकडे असून, कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजिवडा हे मतदार संघ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहेत. तर मिरा, भाईंदर मतदारसंघ हा अपक्ष आमदार गीता जैन यांच्या ताब्यात आहे.
कोपरी पाचपाखाडी : कोपरी पाचपाखाडी मतदार संघाचे नेतृत्व स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करत असून, शिंदे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून या मतदार संघाची ओळख आहे. या मतदार संघातून एकनाथ शिंदे यांच्यासमोर निवडणूक लढवण्याची घोषणा यापूर्वी आदित्य ठाकरे यांनीही केली होती. या मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे विधानसभा तुल्यबळ उमेदवारच नसल्याने मुख्यमंत्र्यांचा विजय निश्चित असल्याची शिंदे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना आहे.
ओवळा-माजिवडा : शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे सध्या या मतदार संघाचे नेतृत्व करत असून, गेली चार टर्म ते या मतदार संघात निवडून येत आहेत. भौगोलिक स्थितीनुसार या मतदार संघातील अर्धा भाग ठाण्यात, तर अर्धा भाग हा मीरा-भाईंदर मतदार शहरात येतो. जैन, गुजराती या मतदारांची संख्या या मतदार संघात अधिक आहे. या ठिकाणीही भाजपकडून दावा करण्यात येत असून, या ठिकाणी जर मैत्रीपूर्ण लढत झाली, तर निवडणुकीत अधिक रंगत पाहायला मिळणार आहे. ठाणे आणि भाईंदरच्या विकास कामांसाठी विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांनी ९०० कोटीपेक्षा अधिक विकास निधी आणला आहे. त्यांच्या प्रचाराचा तो ठळक मुद्दा असेल.
ऐरोली : या मतदार संघांमध्ये विद्यमान आमदार भाजपचे आहेत. मतदारसंघ विभाजनापूर्वी एकिकृत बेलापूर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व गणेश नाईक यांनी चार वेळा केले आहे. सध्या गणेश नाईक है ऐरोली विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. या विधानसभा क्षेत्रामध्ये गणेश नाईक यांच्या विरोधात सध्या तरी तुल्यबळ उमेदवार दिसत नसला, तरी शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेश युवक उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांची नावे चर्चेत आहेत. महायुतीच्या संभाव्य जागा वाटपामध्ये ऐरोली मतदार संघ सध्या भाजपकडे असल्याने हा मतदार संघ पुन्हा भाजपलाच जाण्याची शक्यता आहे.
बेलापूर : हा मतदार संघदेखील भाजपकडे असून, मंदा म्हात्रे या बेलापूर विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात. बेलापूर विधानसभा मतदार संघासाठी ऐरोली विधानसभा क्षेत्राचे दोन वेळा आमदार राहिलेले विद्यमान नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दावा ठोकला आहे. त्यामुळे बेलापूर मतदार संघातून भाजप अंतर्गत मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक यांच्यात उमेदवारीसाठी चुरस आहे, तर शिंदे गटाचे उपनेते विजय नहाटा यांनीदेखील निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे. मनसेच्या वतीने गजानन काळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बेलापूर मतदार संघात भाजपचे आमदार असल्याने या विद्यमान जागा भाजपच्या वाट्याला जाणार आहेत. त्यामुळे महायुतीमधील अन्य इच्छुक अन्य पक्षांचा मार्ग धरणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. महाविकास आघाडीमध्ये उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजूनही या दोन्ही मतदार संघांबाबत दावा करण्यात आलेला नाही.