आसनगाव : मोडक सागर धरण परिसरातील पोलीस चौकी बंद असल्याने धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  pudhari photo
मुंबई

Modak Sagar Dam Security : मोडक सागरची सुरक्षा रामभरोसे

पोलिसांच्या दुर्लक्षामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

आसनगाव : मुंबईसारख्या महानगराला पाणीपुरवठा करणारे वैतरणा अर्थात मोडक सागर धरण हा अत्यंत महत्त्वाचा जलस्रोत असून सध्या या धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धरणाच्या सुरक्षेसाठी ठाणे ग्रामीण व पालघर पोलीस प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी असताना, शहापूर तालुक्यातील ठाणे हद्दीतील पोलीस चौकीत पोलीस कर्मचारी उपस्थित असतात; मात्र पालघर जिल्ह्यातील वाडा हद्दीतील पोलीस चौकी मात्र वर्षभरापासून बंद असल्याने या धरणाची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे, वाडा हद्दीतील या पोलीस चौकीत विद्युत व्यवस्था नसून देखभाल व दुरुस्तीचाही अभाव आहे. त्यामुळे धरणाच्या सुरक्षेसाठी नेमलेले पोलीस या चौकीकडे फिरकत नसल्याची चर्चा आहे. परिणामी, या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वाडा हद्दीतील धरण परिसर हा बहुतांश जंगल आणि दुर्गम भागात येत असल्याने रात्री या परिसरातून कोणालाही सहज प्रवेश करणे शक्य आहे. अशा संवेदनशील ठिकाणी नियमित सशस्त्र पोलीस बंदोबस्त असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात पोलीस चौकीच बंद असल्याने धरण सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोण पार पाडत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

मोडक सागर धरण हे मुंबईच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्याच्या सुरक्षेत कोणतीही हलगर्जीपणा परवडणारा नाही. धरण परिसरातील पोलीस चौक्या कार्यरत ठेवणे, आवश्यक विद्युत व्यवस्था उपलब्ध करणे, पोलीस कर्मचाऱ्यांची नियमित नियुक्ती करणे तसेच रात्रीची गस्त वाढविणे गरजेचे आहे.

अनुचित घटनेनंतरच जाग येणार का?

पालघर पोलीस अधीक्षकांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन वाडा हद्दीतील बंद पोलीस चौकी पुन्हा सुरू करावी, नियमित सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवावा आणि धरणाच्या सुरक्षेचे स्वतंत्र ऑडिट करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या मोडक सागर धरणाच्या सुरक्षेबाबत प्रशासन आणखी किती काळ निष्काळजी राहणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT