Mumbai Local Train : अपुऱ्या मनुष्यबळामुळे ७५ लाख रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

रेल्वेच्या दोन्ही सुरक्षा दलांत तब्बल २,५५९ पदे रिक्त; महिलांच्‍या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर
Mumbai Local Train
Mumbai Local Trainpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : श्रीकांत जाधव

मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या दोन्ही उपनगरीय रेल्वे मार्गांवरून दररोज तब्बल ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. यामध्ये मध्य रेल्वेच्या ४० लाख आणि पश्चिम रेल्वेवरील ३५ लाख प्रवाशांचा समावेश आहे. मात्र, या अफाट प्रवासी संख्येच्या तुलनेत रेल्वे सुरक्षा यंत्रणेकडे अत्यंत अपुरे मनुष्यबळ असल्याचे वास्तव समोर आले आहे.

मुंबईतील रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि सरकारी रेल्वे पोलिसांची (जीआरपी) मिळून एकूण २,५५९ पदे रिक्त असल्याने ७५ लाख प्रवाशांची, विशेषतः महिला प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

Mumbai Local Train
Thane Food Poisoning : मुंब्र्यात 'अफलातून' मिठाईमुळे तरुणाचा मृत्‍यू

नायगाव रेल्वे स्थानकावर लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीचा ५३ वर्षीय जितेंद्र हिरमुखे याने विनयभंग केला. त्याला विरोध करताना झालेल्या झटापटीत आरोपीने तिला रुळांवर ढकलले. या घटनेत तरुणीचा कोपराखालचा डावा हात कापला गेल्याने पुन्हा एकदा रेल्वे प्रवासातील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

रेल्वे प्रवासात तातडीने मदत पुरवण्याची आणि सुरक्षित प्रवासाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाकडून आरपीएफ आणि जीआरपी जवानांकडे असते. मात्र, रेल्वेच्या दोन्ही सुरक्षा दलांतील रिक्त पदांची आकडेवारी पाहता मुंबईतील लाखो प्रवाशांची गर्दी हाताळणे, स्थानकांवर नियंत्रण ठेवणे आणि डब्यांमध्ये गस्त घालणे हे आता या उपलब्ध कर्मचाऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे.

Mumbai Local Train
Sakinaka Land Case : ३४ वर्षे झोपडपट्टी म्हणून वापरच नाही!

रेल्वे प्रवासी संख्येच्या तुलनेत या दोन्ही सुरक्षा दलांतील एकूण २,५५९ पदे रिक्त असल्याने गर्दीच्या वेळी आणि रात्रीच्या प्रवासात प्रवाशांना वाऱ्यावर सोडले जात आहे. महिलांसाठी स्वतंत्र डबे, सीसीटीव्ही, हेल्पलाइन आणि पॅनिक बटण सारख्या सुविधांचे दावे रेल्वे प्रशासनाकडून केले जातात. परंतु, हे सर्व हाताळण्यासाठी आणि संकटात धावून जाण्यासाठी पुरेसे कर्मचारीच नसल्याने या व्यवस्था केवळ गुन्हा घडल्यानंतर तपासापुरत्या उरल्या आहेत का, असा सवाल रेल्वे महिला प्रवासी संघटनेकडून केला जात आहे.

कुठे किती, कोणती पदे रिक्त?

  • मुंबईतील दोन्ही रेल्वे विभागांत मिळून आरपीएफची ७,०४२ पदे मंजूर आहेत. परंतु, सध्या केवळ ५,२२६ जवान कार्यरत असून, अजूनही १,८१६ पदे रिक्त आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ५,१४८ पैकी ३,८५२ कर्मचारी कार्यरत आहेत.

  • अजूनही १,२९६ पदे रिक्त आहेत. तर, पश्चिम रेल्वेत १,८९४ पैकी १,३७४ कर्मचारी कार्यरत असून, ५२० पदे रिक्त आहेत. जीआरपीमध्ये ४,२४३ मंजूर पदांपैकी केवळ ३,५०० पोलीस कार्यरत आहेत. अजूनही ७४३ पदे रिक्त आहेत.

रेल्वे प्रशासनाकडून महिलांच्या सुरक्षेबाबत हेल्पलाइन, सीसीटीव्ही आणि पोलिसांची गस्त अशा उपाययोजनांचा उल्लेख केला जातो. मात्र, या घोषणा केवळ कागदावरच आहेत. १५ डब्यांच्या गाड्या अजून सुरू नाहीत. अजून किती महिला प्रवाशांचा रेल्वे जीव घेणार? प्रशासनाच्या या बेजबाबदार कारभाराविरोधात आंदोलन करणार आहे.

वंदना सोनावणे, अध्यक्षा, महा. रेल्वे महिला प्रवासी संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.