मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बंधू उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा असतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मराठी माणसाने साथ दिलीच नाही. त्यामुळे मुंबईत 52 प्रभागांत निवडणूक लढवूनही अवघ्या सहा प्रभागांत यश मिळाले. एवढेच नाही तर मतांच्या टक्केवारीमध्येही मोठी घट झाली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे विजय ठाकरे बंधूंचाच होईल, एवढेच नाहीतर बिथरलेला मराठी माणूस एक होईल, असे वाटत होते. पण महापालिकेचा निकाल बघितल्यानंतर मराठी माणूस ठाकरेंसाठी एकवटला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषत: मराठी मनासाठी परप्रांतीयांशी लढणाऱ्या मनसेकडेही मराठी माणसाने पाठ फिरवली आहे.
एवढेच काय तर उद्धव ठाकरे यांनाही 100 टक्के मराठी माणसाचा पाठिंबा मिळालेला नाही. हे निवडणुकीत पडलेल्या मतांच्या टक्केवारीवरून स्पष्ट होते. शिवसेना (उबाठा) यांच्या मतांच्या टक्केवारीमध्येही तब्बल 20 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. एकूण मतदानाची टक्केवारी लक्षात घेता, उद्धव ठाकरे सेनेला अवघी 13.13 टक्के मते मिळाली, तर मनसेला अवघी 1.37 टक्के मते मिळाली.
भाजपाला एकूण मतदानाच्या 21.58 टक्के मते मिळाली आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 5 टक्के मते मिळाली. जी मनसेपेक्षाही जास्त आहेत. काँग्रेसचे मताधिक्यही घटले असून त्यांना 4.4 टक्के मते मिळाली, तर एमआयएमला 1.25 टक्के मते मिळाली.
2026 मधील मतांची टक्केवारी
भाजप - 21.58%
शिवसेना (उबाठा) -13.13%
शिवसेना- 5%
काँग्रेस- 4.44 %
मनसे- 1.37 %
राष्ट्रवादी- 0.45%
समाजवादी पक्ष - 0.28%
एमआयएम- 1.25%
2017 मधील मतांची टक्केवारी
शिवसेना - 30.41%
भाजप -28.28%
काँग्रेस -16.69%
मनसे- 8.52 %
राष्ट्रवादी - 5.74%
समाजवादी पक्ष- 4.87 %