

मुंबई : भाजपने शिवसेना संपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आमचे अर्धे नगरसेवक त्यांनी गळाला लावले, पण आता ते गाळात गेले आहेत, अशी टीका करत भाजपने कागदावरती शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाही. कारण भाजप हा कागदावरचा पक्ष आहे, तो जमिनीवरचा पक्ष नाही आहे, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला.
भाजप हा जमिनीवरती असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते, त्यांना पुसली जाणारी शाई वापरावी लागली नसती, यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता, नियम बदलावे लागले नसते, अशी टीकाही उद्धव यांनी शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
राज्यातील महापालिका निवडणुकीत ठाकरे सेना 65 जागा मिळवत मुंबईत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मात्र मुंबईची सत्ताही उद्धव यांनी गमावली. त्यानंतर प्रथमच माध्यमांशी संवाद साधत उद्धव म्हणाले, मुंबईकरांकडून आम्हाला जास्त अपेक्षा होती, भरघोस आशीर्वाद देतील असे वाटले होते. पण आम्हाला मोठा आशीर्वाद दिला नसला तरी जे आशीर्वाद दिले ते ठीक आहेत.
महापालिकेमध्ये शिवसेनेचे लोकप्रतिनिधी सभागृहात गेल्यानंतर मुंबई महापालिकेची तिजोरी कोणी-कशी लुटली, कसे गैरव्यवहार झाले, याचा भंडाफोड करतील. शिवसेना, मनसे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी हे काम करतील. आम्ही वचननामा जनतेसमोर ठेवलाय त्याचासुद्धा पाठपुरावा करणार अशी ग्वाही देत मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच वापरली जाईल याचे दडपण आम्ही या मुंबई लुटणाऱ्यांवर ठेवणार, असा इशाराही उद्धव यांनी दिला.
न सुटलेले कोडे
मोदींची सभा झाली, त्यावेळी खुर्च्या रिकाम्या होत्या. माझी आणि राज ठाकरे यांची शिवाजी पार्कला सभा झाली. शिवाजी पार्क फुलून गेले होते. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी भाजप-शिंदे सेनेच्या सभेला सगळी खुर्च्यांची गर्दी होती.आमच्याकडे गर्दी जमते, पण मतदान होत नाही. परंतु, त्यांच्याकडे खुर्च्या मतदान करू शकतात हे पहिल्यांदा आम्हाला कळले. हे एक न सुटलेले कोडं आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला लगावला.
शिवसेना भवनचा वॉर्ड जिंकून आणला
शिवसेना भवन वॉर्ड आम्ही जिंकून आणला, मनसे शिवसेना कोणाला कोणाची मदत झाली असे नाही. आम्ही एकदिलाने लढलो. एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी, असे म्हणत शिवसेना-मनसे युतीवरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केले. काँग्रेस तुमच्यासोबत असती तर, असा प्रश्न विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले, तुमच्यासोबत असते तर म्हणजे आत्याला मिशी का नाही? असे विचारण्यासारखे आहे, असे म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला. मुंबईत आमचे 54 नगरसेवक फोडले, तरीही आमचे 65 नगरसेवक निवडून आले आहेत. आता, 21 आणि 22 तारखेला सुनावणी आहे, पक्ष आणि चिन्ह निर्णय होईल. त्यावेळी जर पक्ष, चिन्ह मिध्यांचे गेले तर काय अस्तित्व राहील? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
लढाई संपलेली नाही!
मुंबई : धनशक्तीच्या जोरावर लढणाऱ्यांना आपण शक्तीच्या जोरावर घाम फोडलात. शेवटी जिद्द महत्त्वाची असते आणि जिद्द कोणीही विकत घेऊ शकत नाही. त्या जिद्दीच्या जोरावर आपण पुन्हा जिंकू, असा विश्वास व्यक्त करत लढाई संपलेली नाही. उलट आता लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र राहा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी शनिवारी मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.