MNS Chhath Puja Mumbai Pudhari
मुंबई

MNS Chhath Puja Mumbai: मुंबईत चक्क मनसेकडूनच छठपूजेचं आयोजन; चर्चांना उधाण, कोणत्या नगरसेवकाने ठेवला कार्यक्रम?

MNS Chhath Puja Mumbai: राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर मनसेच्याच नगरसेविकेने छठपूजेचा कार्यक्रम आयोजित केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Rahul Shelke

MNS Chhath Puja Mumbai: मुंबईत छठपूजेवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता मनसेच्याच एका नगरसेविकेने छठपूजेचे आयोजन केल्याची माहिती समोर आली आहे. मालाड पूर्वेकडील आप्पा पाडा परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एकीकडे मनसेकडून मुंबईतील काही ठिकाणी छठपूजेला विरोध केला जात असताना दुसरीकडे पक्षाच्या नगरसेविकेकडूनच पूजेची तयारी सुरू असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

मालाडमधील आप्पा पाडा परिसरात मनसेच्या नगरसेविका सुरेखा परब आणि त्यांचे भाऊ तसेच मनसेचे विभाग अध्यक्ष भास्कर परब यांनी छठपूजेचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी परिसरात जोरदार तयारी करण्यात आली आहे. एवढेच नाही, तर छठपूजेची माहिती देणारे मोठमोठे बॅनरही परिसरात लावण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, छठपूजेच्या मुद्द्यावरून मनसेची भूमिका चर्चेत आहे. त्यामुळे पक्षातीलच नगरसेविकेने अशा प्रकारे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केल्याने या भूमिकेतील फरकाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

छठपूजेवरून मनसे आक्रमक भूमिका का घेत आहे?

मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलाव आणि गिरगाव चौपाटी येथे छठपूजा करण्याच्या मुद्द्यावरून मनसेने यापूर्वी तीव्र विरोध दर्शवला होता. बाणगंगा तलाव परिसरात छठपूजेच्या आयोजनाला विरोध करत मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत पूजा होऊ देणार नाही, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या मुद्द्यावरून आपली भूमिका स्पष्ट केली होती. छठपूजेच्या नावाखाली महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शन केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच, धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वातावरणावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते.

याशिवाय, उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप मुंबईत मराठी आणि उत्तर भारतीय समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला होता.

मनसेच्या भूमिकेवरून नव्या चर्चांना सुरुवात

छठपूजेच्या मुद्द्यावरून मनसेने घेतलेली आक्रमक भूमिका आणि आता पक्षाच्याच नगरसेविकेकडून आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम यामुळे राजकीय चर्चांना नवे वळण लागले आहे.

एका बाजूला बाणगंगा आणि गिरगाव चौपाटीसारख्या ठिकाणी छठपूजेला विरोध केला जात आहे, तर दुसऱ्या बाजूला मालाडमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडूनच छठपूजेचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे मनसेची भूमिका नेमकी काय आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT