बोरिवली-गोराई परिसरातील प्रस्तावित कबुतरखान्याला मनसेचा तीव्र विरोध File Photo
मुंबई

Mumbai News : बोरिवली-गोराई परिसरातील प्रस्तावित कबुतरखान्याला मनसेचा तीव्र विरोध

महापालिकेने निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा दिला इशारा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारे श्वसनाचे आणि इतर गंभीर आजार लक्षात घेऊन शहरातील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही, महापालिकेने बोरिवली आणि गोराई परिसरात कबुतरखान्यासाठी जागा निश्चित केली आहे. मात्र या प्रस्तावित कबुतरखान्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विरोध करण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन पालिकेच्या आर. मध्य विभागातील सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहे. तसेच पालिकेने हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे बोरिवली विधानसभा विभाग अध्यक्ष कबीरदास मोरे यांनी दिला.

कबुतरांमुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या दृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला कबुतरखाना बंद करण्याचे आदेश दिले. मात्र, या बंदीविरोधात जैन समाज आक्रमक झाल्यानंतर न्यायालयाने मुंबई महापालिका प्रशासनाला लोकवस्तीपासून दूर ठिकाणी कबुतरखान्यासाठी पर्यायी जागा सुचवण्याचे निर्देश दिले. यानंतर पालिकेने चार ठिकाणी कबुतरखान्यासाठी जागा प्रस्तावित केल्या. त्यातील एक जागा बोरिवली गोराई परिसरातील आहे. पालिकेच्या या निर्णयाला मनसेकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे.

कबुतरांच्या विष्ठेमुळे परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरून नागरिकांना आरोग्यविषयक त्रास होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यासाठी पालिकेने कबुतरांची अनियंत्रित वाढ थांबवण्यासाठी धोरण आखावे. तसेच, हा प्रस्ताव कोणाच्या पुढाकाराने ठेवला गेला आणि त्यामागील कारणमीमांसा काय, याबाबतही सविस्तर माहिती सार्वजनिक करण्याचे आव्हान पालिकेला दिले आहे. पालिकेच्या या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिकांकडून देखील मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागरिकांसोबत मिळून हा प्रश्न न्याय्य मार्गाने सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याचे मनसेच्यावतीने सांगण्यात आले.

पालिका अधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित विभागाकडून अहवाल मागवण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच ज्याठिकाणी पालिका कबुतरखाना तयार करू इच्छिते, त्या परिसरात किमान 20-25 हजार लोक राहतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण होत आहे. पालिकेने हा निर्णय रद्द केला नाही. तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.
कबीरदास मोरे, बोरिवली विभाग अध्यक्ष, मनसे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT