

मुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबुतरखान्यांचा विषय आता आणखी पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शनिवारी (दि.11) जैन समुदायाच्या धर्मसभेनंतर 'आम्ही गिरगावकर' संघटना आता आक्रमक झाली आहे. 'कबुतर, गो बॅक टू मारवाड!' अशा आशयाचे बॅनर गिरगावात लावण्यात आले आहेत. शांतीदूतांना आता त्यांच्या राज्यात पाठवण्याची व्यवस्था प्रत्येक मराठी माणसाला करावी लागेल, असे या पोस्टर्स 'आम्ही गिरगावकर' तर्फे लावण्यात आले आहेत.
शनिवारी जैन समुदायाची दादरमध्ये धर्मसभा पार पडली होती. या सभेमध्ये जैन मुनींनी कबुतरखाने बंद केल्याच्या निषेधार्थ नव्या राजकीय पक्षाची घोषणा करून आगामी महपालिका निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला होता. कबुतरखान्यांना जागा न देणाऱ्या सरकारला घरी बसवू आणि आमचे सरकार
स्थापन करू, अशी घोषणा केली होती. त्याचबरोबर कबुतरांना श्रद्धांजली वाहत डॉक्टरांना मूर्ख ठरवले होते. एखाद-दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर काय बिघडते, असा मुजोरपणा केला होता. त्यावरून 'आम्ही गिरगावकर'चे गौरव सागवेकर यांनी, 'करोडोंचा टॅक्स भरून तुम्ही तुमच्या राज्याचे भले करा, आमचे आम्ही बघू!' असा टोला लगावला आहे. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची बरोबरी करणाऱ्या जैन समाजाचा त्यांनी समाचार घेतला. जैन समाजाच्या भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून आम्ही 'कबुतर गो बॅक टू मारवाड!' अशा आशयाचे बॅनर झळकवल्याचे गौरव सागवेकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, मंत्री मंगल प्रभात लोढांना त्यांच्या नव्या क्लबमध्ये कबुतरखाना उभारायला सांगा आणि माणसांना माणसांसारखे जगू द्या, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.