Kurla Crane Collapse Pudhari
मुंबई

Kurla Crane Collapse: कुर्ल्यात हाहाकार! पाडकाम सुरू असताना महाकाय क्रेन अचानक कोसळली; रेल्वे मार्गासह झोपडपट्टीचे नुकसान

Kurla Crane Collapse: कुर्ला पूर्वेतील उमरवाडी परिसरात अनधिकृत इमारतीच्या पाडकामादरम्यान MMRDAची क्रेन कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली.

पुढारी वृत्तसेवा

Kurla Crane Collapse: मुंबईतील कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर मोठी दुर्घटना घडली. कुर्ला पूर्वेतील कुरेशी नगर परिसरातील उमरवाडी येथे सुरू असलेल्या अनधिकृत इमारतीच्या पाडकामादरम्यान MMRDAची क्रेन कोसळली. ही क्रेन समोरील रहिवासी सेवा संघाच्या झोपडपट्टीवर तसेच रेल्वे मार्गिकेच्या काही भागावर पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

स्थानिकांच्या माहितीनुसार, ही दुर्घटना रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली. क्रेन कोसळल्याने झोपडपट्टीतील काही घरांचे नुकसान झाले. या घटनेत सुमारे 10 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापूर्वीच्या प्राथमिक माहितीनुसार दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते.

दरम्यान, क्रेनचा काही भाग कुर्ला-ट्रॉम्बे दरम्यानच्या रेल्वे मार्गावर आणि OHE अर्थात ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरवर कोसळला. मात्र हा मार्ग सिंगल लाईन असून त्याचा वापर प्रामुख्याने मालवाहतूक रेल्वेसाठी केला जातो. त्यामुळे प्रवासी रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

Central Railway, Mumbai Division कडून या घटनेची नोंद घेण्यात आली असून, दुर्घटनेची जबाबदारी MMRDAची असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. क्रेन हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. रेल्वे मार्गावरील OHE वायरची दुरुस्तीही करण्यात आली असून, संबंधित यंत्रणा परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी काम करत आहेत.

दुर्घटनेनंतर परिसरात प्रशासन, रेल्वे आणि संबंधित यंत्रणांकडून मदतकार्य सुरू करण्यात आले. क्रेन नेमकी कशामुळे कोसळली, पाडकामाच्या कामात सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का आणि या दुर्घटनेला नेमके कोण जबाबदार आहे, याबाबत पुढील तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT