Mithi River Drain Pudhari
मुंबई

Mithi River Drain: मुंबईत मिठीसह नालेसफाई लांबणीवर; कंत्राटदार नेमणुकीला उशीर

निविदा प्रक्रिया अद्याप अपूर्ण; 17 मार्चला टेंडर उघडणार असल्याची महापौर रितू तावडे यांची कबुली

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : गेल्यावर्षी नालेसफाईचा फज्जा उडाल्याने या वर्षील हे काम लवकर हाती घेण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले होते. मात्र आजपर्यंत या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे यंदाही नालेसफाई लांबणीवर पडणार आहे.

शुक्रवारी स्थायी समिती सभागृहात महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली मिठी नदी व नालेसफाई कामांचा आढवा घेण्यात आला. यात महापौरांनी हे काम लांबणीवर पडल्याचे मान्य करीत 17 मार्च रोजी निविदा उघडण्यात येणार असून त्यानंतर तातडीने कामाचे आदेश दिले जातील, असे सांगितले.

मुंबईची नालेसफाई कामातील गैरकारभारामुळे ती चर्चेत आहे. एकाच कंत्राटदारांकडून ही सफाई करण्यात येत होती, आता कंत्राटदारांची ही मक्तेदारी मोडीत काढली आहे.

अनुभव नसणाऱ्या कंत्राटदारांनाही नाले सफाईच्या कामात सहभागी होता येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. तसेच आवश्यक मनुष्यबळ व संसाधनांचा प्रभावीपणे वापर करून, वॉर्ड स्तरावरील प्रशासकीय विभाग कार्यालय आणि मध्यवर्ती यंत्रणा यांच्यात समन्वय राखून कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील, असेही आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

नाल्यातून काढलेल्या गाळाची 48 तासांत योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. नाले स्वच्छतेच्या कामात पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी गाळ काढण्यापासून ते क्षेपणभूमीवर त्याची विल्हेवाट लावण्यापर्यंतच्या सर्व टप्प्यांचे छायाचित्रण, चित्रिकरण अनिवार्य करावे, असे विविध निर्देश महापौर तावडे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

यावेळी उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, सुधार समिती अध्यक्ष संध्या दोशी, पालिका आर.मध्य, आर.उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश दरेकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अविनाश ढाकणे यांच्यासह सर्व परिमंडळ सहआयुक्त/ उपायुक्त, सर्व विभागांचे सहायक आयुक्त तसेच पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

मिठी नदीची सफाई करण्यासाठी 90 दिवस जातात. नवीन कंत्राट नियुक्तीसाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. 17 मार्चला निविदा उघडणार आहे. त्यामुळे नालेसफाईसाठी मुंबई महानगरपालिकेने आपली यंत्रणा कामाला लावली असून काम हाती घेतले आहे.
प्रभाकर शिंदे, अध्यक्ष, स्थायी समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT