मुंबई : मिठी नदीच्या सफाईसाठी काढण्यात आलेली प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून शुक्रवार निविदा उघडण्यात येणार आहे. त्यानंतर स्थायी समितीच्या मंजुरीनंतर प्रत्यक्षात सफाईच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नदीच्या सफाईचा मुहूर्त पुढील आठवड्यात साधला जाणार आहे.
निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मिठी नदीच्या सफाईसाठी कंत्राटदार नेमण्यास विलंब झाला. मिठी नदीसाठी स्वतंत्र नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून ही निविदा प्रक्रिया शुक्रवारी 27 मार्चला उघडण्यात येणार असल्याचे बुधवारी स्थायी समितीत अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.
निविदा उघडल्यानंतर तातडीने त्याचा प्रस्ताव सचिव विभागाला पाठवून स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येईल. यासाठी पुढील आठवड्यातील बुधवार उजाडणार आहे. समितीची मंजुरी मिळाल्यानंतर कंत्राटदाराला तातडीने कार्याध्यक्ष देऊन कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे बांगर यांनी समितीत सांगितले.
दरम्यान सर्व उपनगरातील अन्य लाल यांची सफाई 1 एप्रिलपासून युद्धपातळीवर सुरू होऊन, ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न राहणार असल्याचेही बांगर यांनी सांगितले.
स्थायी समितीत मिठीसह मुंबईतील नालेसफाईचे सादरीकरण
नालेसफाई कंत्राटदारांची गाळ काढणे व टाकण्यासंदर्भात असलेली बनवाबनवी हाणून पाडण्यासाठी महापालिकेने एआय तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. नालेसफाईचे काम सुरू होण्यापूर्वी, प्रत्यक्ष काम सुरू असताना आणि काम संपल्यानंतर अशा तिनही टप्प्यांमध्ये प्रत्यक्ष दिनांक, वेळ, अक्षांश, रेखांश (रिअलटाइम जिओ टॅग) यासह चित्रफित व छायाचित्रे तयार करून ती सॉफ्टवेअरवर अपलोड करणे कंत्राटदारांना बंधनकारक करण्यात येणार आहे. डम्पिंग ग्राउंडवर गाळ टाकण्यासाठी जाणाऱ्या गाडीचे चित्रीकरण गाळासह करणे बंधनकारक करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी समितीमध्ये सांगितले.