Mithi River Cleaning
मुंबई : अर्धा जून महिना संपत आला तरी मिठी नदीची साफसफाई सुरूच आहे. आतापर्यंत नदीतून 60 टक्के गाळ उपसण्यात आला असून अजून 40 टक्के गाळ उपसण्याचे काम बाकी आहे. पण पावसाळा सुरू झाल्यामुळे आता नदीतील 100 टक्के गाळ उपसणे अशक्य असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई शहर व उपनगरातील नालेसफाईचे काम 31 मेपूर्वी पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले होते. पण मे महिन्यात सुरु झालेला पाऊस व कंत्राटदार व पालिकेच्या दुर्लक्षामुळे आतापर्यंत 100 टक्के गाळ उपसणे शक्य झाले नाही. आतापर्यंत विविध नाल्यांतून 82 टक्के गाळ उपसण्यात आला असून 18 टक्के गाळ उपसणे बाकी आहे. हा गाळ उपसण्याचे येत्या 15 जूनपर्यंतचे टार्गेट ठेवण्यात आले असले तरी पूर्ण गाळ उपसणे शक्य नाही.
मिठी नदीच्या साफसफाईकडेही महापालिकेसह कंत्राटदाराचे दुर्लक्ष झाले आहे. मिठी नदीतून यावर्षी 2 लाख 14 हजार 315 मेट्रिक टन गाळ उपसण्याचे टार्गेट ठेवण्यात आले होते. 1 लाख 30 हजार 526 मेट्रिक टन गाळ उपसण्यात आला. आता मुंबईत पाऊस दाखल झाल्यामुळे नदीतील गाळ उपसताना तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे यंदा नदीतील 100 टक्के गाळ उपसण्याचे टार्गेट गाठणे आता शक्य नसल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, पूर्व व पश्चिम उपनगरातील नालेसफाईची कामे पूर्ण झाली असून ठरलेल्या टार्गेटपेक्षा आता जास्त गाळ उपसण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पश्चिम उपनगरातून 2 लाख 21 हजार मेट्रिक टन गाळ उपसण्यात आला असून पूर्व उपनगरातील नाल्यातून 1 लाख 27 हजार मेट्रिक टन गाळ उपसण्यात आला आहे.