Mission Admission FY seats reputed colleges filling up
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
एफवायच्या प्रवेशात दुसर्या यादीत वाढ झालेली दिसली नाही यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 80 ते 90 टक्केच्या आतच कटऑफ पहायला मिळाले असून या दरम्यान गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. नामवंत महाविद्यालयांतील जागा फुल्ल होण्याच्या मार्गावर असून अनेक महाविद्यालयांत तिसर्या यादीत कमी प्रवेश होतील अशी स्थिती तयार झाली आहे.
पदवी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी शनिवारी सायंकाळी 7 नंतर जाहीर करण्यात आली. कमी टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्यांना तिसर्या यादीची प्रतीक्षा करावी लागली आहे. यामुळे तिसरी यादी जाहीर होईपर्यंत एफवाय प्रवेश मिळवताना विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक दिसणार आहे. पहिल्या यादीत काही अभ्यासक्रमांचे कट-ऑफ वाढले होते. त्यामुळे 80 ते 90 टक्के असे गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या.
मात्र, दुसर्या यादीत काही महाविद्यालयांनी कट-ऑफ कमी केल्यामुळे अधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.रुईया महाविद्यालयातील बीएससी कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमाचा कट-ऑफ पहिल्या यादीत 80.17 टक्के होता, जो दुसर्या यादीत 76 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. पोदार महाविद्यालयातील बीएससी डेटा सायन्स अभ्यासक्रमातही सुमारे सात टक्क्यांची घट झाली आहे.
तर दुसरीकडे, काही मागणी असलेल्या अभ्यासक्रमांचे कट-ऑफ वाढलेले आहेत. तर यंदाच्या प्रवेशात बॅचलर इन अकाउंटिंग अँड फायनान्स (बॅफ), बॅचलर इन बँकिंग अँड इन्शुरन्स (बीबीआय) आणि बॅचलर इन मास मीडिया (बीबीएम) या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला दिसत आहे.
दुसर्या गुणवत्ता यादीमुळे 80 ते 90 टक्क्यांच्या दरम्यान गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना महत्त्वाचा दिलासा मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची शनिवारी दुसरी यादी थोडी कमी झालेली असली तरी 70 ते 80 टक्केवारी असूनही नामांकित महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी रांगेत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना आता इतर महाविद्यालयांत प्रवेशासाठी संधी शोधावी लागणार आहे.