Minority Colleges Reservation
मुंबई : राज्यातील अल्पसंख्यांक महाविद्यालयामध्ये अल्पसंख्यांक कोटा व व्यवस्थापन कोट्यातील जागांव्यतिरिक्त शिल्लक राहणार्या जागांवर खुल्या प्रवर्गातून प्रवेश दिले जात होते. त्यामुळे या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागत होता. मात्र आता नव्या शैक्षणिक वर्षामध्ये या नियमात बदल करत प्रवेशामध्ये अल्पसंख्यांक महाविद्यालयांमध्ये या कोट्याव्यतिरिक्त शिल्लक जागांवरील प्रवेश हे आरक्षण प्रवर्गनिहाय होणार आहेत.
राज्यामध्ये मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, सिंधी अशा समाजासाठी अल्पसंख्यांक दर्जा असलेली महाविद्यालये आहेत. अकरावी प्रवेशादरम्यान अल्पसंख्यांक महाविद्यालयांमध्ये राखीव असलेल्या समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी 50 टक्के जागा राखीव आहेत, तर 5 टक्के जागा व्यवस्थापन कोट्यासाठी राखीव असतात. उर्वरित 45 टक्के जागांवर खुल्या प्रवर्गातून प्रवेश दिले जात होते. तसेच अल्पसंख्यांकांसाठी राखीव असलेल्या जागांवर पुरेशा विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास त्या जागाही खुल्या प्रवर्गासाठी वर्ग केल्या जातात. यावरही खुल्या प्रवर्गातच प्रवेश होतात. यंदा मात्र या नियमात बदल केला आहे.
राज्याच्या अल्पसंख्याक विभागाच्या शिफारशीनुसार उर्वरित बिगर-अल्पसंख्याक जागांवर आरक्षण लागू करण्याच्या निर्णयाची शालेय शिक्षण विभागाकडून अमलबजावणी करण्यात आली आहे. त्यानुसार नव्या शैक्षणिक वर्षामध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेत अल्पसंख्याक महाविद्यालयातील कोट्यातील जागा वगळता अन्य जागांवर आता आरक्षण लागू केले आहे.
त्यानुसार अनुसूचित जातीसाठी 13 टक्के, अनुसूचित जमातीसाठी 7 टक्के, विमुक्त जातीसाठी तीन टक्के, भटक्या जमाती (ब) 2.5 टक्के, भटक्या जमाती (क) 3.5 टक्के, भटक्या जमाती (ड) 2 टक्के, इतर मागासवर्गीयांसाठी 19 टक्के, विशेष मागासवर्गीयांसाठी 2 टक्के, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले वर्ग 10 टक्के, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय 10 टक्के याप्रमाणे हे आरक्षण उर्वरित जागांसाठी लागू करण्यात आले आहे.
शालेय शिक्षण विभागाने 6 मे रोजी काढलेल्या शासन निर्णयामध्ये ही बाब नमूद केली असली तरी यामध्ये स्पष्टता नव्हती. त्यातच 2 जून रोजी शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकामध्येही अल्पसंख्यांक महाविद्यालयांमधील या आरक्षणाचा मुद्दाच वगळण्यात आला आहे. यामुळे अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर आरक्षण प्रवर्गनिहाय आता उर्वरित जागा दाखविण्यात आल्याने कनिष्ठ महाविद्यालये व विद्यार्थ्यांमध्ये अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे.
अल्पसंख्यांक विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार अल्पसंख्यांक महाविद्यालयांतील कोट्याव्यतिरिक्त जागांवर आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील गोंधळ दूर केला जाणार आहे. संकेतस्थळावर दाखवण्यात येणार्या वर्गवारीप्रमाणे पहिल्या फेरीसाठी आरक्षण लागू असणार आहे, अशी माहिती शिक्षण संचालक कार्यालयातून देण्यात आली.