Milk Adulteration AI Photo
मुंबई

Milk Adulteration: दूध भेसळीला आता गुन्हेगारी साखळीचाही हातभार

पाण्यापासून सिंथेटिक दुधापर्यंत; बनावट पॅकिंग, ब्रँडच्या नावाचा गैरवापर अन् पुरवठा साखळीवर पोलिसांची नजर

पुढारी वृत्तसेवा

महेश पांचाळ

मुंबई: दूध हे रोजच्या आहारातील अत्यावश्यक घटक; मात्र त्याच दुधात भेसळ करून नफा कमावण्याचे प्रकार आता केवळ पाणी मिसळण्यापुरते राहिलेले नाहीत. सिंथेटिक दूध तयार करणे, नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट पाकिटे वापरणे, कमी दर्जाचे दूध मिसळणे आणि परवान्याशिवाय विक्री अशा विविध मार्गांनी ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे अलीकडील पोलिस कारवायांतून समोर येत आहे. त्यामुळे दूध भेसळीचा प्रकार आता अन्नसुरक्षेबरोबरच गुन्हेगारी साखळीचा विषय बनला आहे.

मुंबईच्या कांदिवली परिसरात नुकत्याच झालेल्या कारवाईत अमूल आणि गोकुळ या ब्रँडच्या नावाने दूध विक्री केल्याचा प्रकार समोर आला. समतानगर पोलिसांनी कारवाई करून ७४ लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले.

दुधात अशुद्ध पाणी मिसळून ते ग्राहकांना विकले जात असल्याचा आरोप असून, या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आली. या कारवाईमुळे स्थानिक पातळीवर दूध भेसळ करणारे किती वेगवेगळे मार्ग वापरतात, याकडे लक्ष गेले आहे.

परवान्याच्या नावानेही फसवणूक

दूध भेसळीबरोबरच अन्न व्यवसायाशी संबंधित आणखी एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. अन्न व्यवसायाचा परवाना मिळवून देण्याच्या नावाखाली बनावट अधिकारी किंवा एजंट बनून पैसे उकळण्याचे प्रकार होत असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. यामुळे अन्न व्यवसायाच्या क्षेत्रात एकीकडे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणारी भेसळ, तर दुसरीकडे व्यवसायिकांची आर्थिक फसवणूक, अशी दुहेरी गुन्हेगारी साखळी तयार होत असल्याचे चित्र आहे.

एफडीएकडून पुरवठा साखळीवर लक्ष

दूध भेसळीच्या वाढत्या प्रकारानंतर अन्न व औषध प्रशासनाने दूध संकलन केंद्रापासून डेअरी, वाहतूकदार, वितरक आणि विक्रेत्यांपर्यंतच्या संपूर्ण साखळीवर लक्ष केंद्रित केले आहे. दूध कुठून आले, त्यावर कोणती प्रक्रिया झाली आणि ते कोणत्या विक्रेत्यामार्फत ग्राहकापर्यंत पोहोचले, याचा मागोवा घेण्यावर भर दिला जात आहे. तथापि, आगामी काळात दूध भेसळीच्या प्रकरणांत केवळ नमुने तपासून कारवाई न करता संपूर्ण आर्थिक आणि पुरवठा साखळीचा तपास होणे अपेक्षित आहे.

पाण्यापासून ‘सिंथेटिक’ दुधापर्यंत

काही ठिकाणी दुधासारखे दिसणारे सिंथेटिक मिश्रण तयार करून त्याची विक्री केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. राज्यातील अलीकडील कारवायांमध्ये निकृष्ट पदार्थांचा वापर केल्याचे आरोप झाले आहेत.

अशा प्रकारात ग्राहकाला दिसणारे उत्पादन दूध असल्याचा भास होतो; मात्र त्यामध्ये दुधाचे प्रमाण किती आणि इतर पदार्थ किती, हा प्रश्न निर्माण होतो.

ब्रँडची नक्कल; ग्राहकांची दिशाभूल

भेसळीच्या व्यवसायातील आणखी एक प्रकार म्हणजे नामांकित दूध कंपन्यांच्या नावाचा आणि पॅकिंगचा होणारा गैरवापर. ग्राहकांचा प्रसिद्ध ब्रँडवरील विश्वास हा अशा भेसळखोरांसाठीच नवा कमाईचा मार्ग ठरत आहे.

बनावट पॅकिंग तयार करून त्यात भेसळयुक्त दूध भरले जाते आणि ते मूळ कंपनीचे उत्पादन असल्याचा भास निर्माण केला जातो.

दूध भेसळीची साखळी किती मोठी?

दूध भेसळ करणारी एकटी व्यक्ती किंवा छोटा विक्रेता एवढ्यावर तपास थांबवून चालणार नाही. कच्चा माल मिळविणारा, दूध किंवा मिश्रण तयार करणारा, पॅकिंग करणारा, वाहतूक करणारा अशी संपूर्ण पुरवठा साखळी असते.

राज्यात भेसळयुक्त दूध, त्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त झाले. त्यामुळे या प्रकरणांमागे संघटित पद्धतीने काम करणारे नेटवर्क असल्यचा संशय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT