

मुंबई: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव कायम असून, यंदा डेंग्यूच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. २१ ऑगस्टअखेर राज्यात मलेरियाचे १२ हजार २१९, डेंग्यूचे ६ हजार ३७९ आणि चिकुनगुनियाचे १ हजार ९३ रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मुंबई आघाडीवर आहे.
२०२५ मध्ये २१ ऑगस्टअखेर राज्यात मलेरियाचे १३ हजार ६५८ रुग्ण आढळले होते. यंदा ही संख्या १२ हजार २१९ वर आली आहे. मलेरियामुळे यंदा दोन मृत्यू झाले असून, एकूण रुग्णांपैकी ४ हजार ३९३ रुग्ण पी.एफ. (Plasmodium falciparum) प्रकारातील आहेत.
मात्र, डेंग्यूच्या बाबतीत परिस्थिती उलट आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ४ हजार ३४४ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली होती. यंदा हा आकडा ६ हजार ३७९ वर पोहोचला आहे. डेंग्यूमुळे यंदा तीन मृत्यू झाले आहेत. चिकुनगुनियाचे १ हजार ९३ रुग्ण आढळले असून, या आजारामुळे अद्याप एकही मृत्यू झालेला नाही.
मलेरियात मुंबई आघाडीवर
जिल्हानिहाय आकडेवारीत गडचिरोलीत मलेरियाचे सर्वाधिक ३ हजार ४२६ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २ हजार ७५४ रुग्ण पी.एफ. प्रकारातील आहेत. गडचिरोलीत मलेरियामुळे दोन मृत्यू झाले आहेत. त्यानंतर रायगडमध्ये ३४१, गोंदियात १२६ आणि चंद्रपूरमध्ये ९२ रुग्ण आढळले.
महापालिका क्षेत्रांचा विचार करता मुंबईत मलेरियाचे तब्बल ६ हजार ३३९ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १ हजार २०० रुग्ण पी.एफ. प्रकारातील आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात ५०२, पनवेलमध्ये ३९४, तर मीरा-भाईंदरमध्ये १०० मलेरिया रुग्णांची नोंद झाली आहे.
डेंग्यूमध्येही मुंबई पुढे
डेंग्यूच्या रुग्णसंख्येतही मुंबईचा आकडा सर्वाधिक आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात १ हजार ८१० डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. पुणे महापालिका क्षेत्रात १ हजार १४०, तर ठाणे महापालिका क्षेत्रात ४५० रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यांमध्ये पालघरमध्ये २४०, पुण्यात १९३, धुळ्यात १४८ आणि लातूरमध्ये १२६ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील डेंग्यू नियंत्रणासाठी मुंबईसह पालघर, पुणे या भागांवरही आरोग्य विभागाचे विशेष लक्ष आहे.
चिकुनगुनियात पालघर आघाडीवर
चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत पालघर २६४ रुग्णांसह आघाडीवर आहे. पुणे जिल्ह्यात १३८, लातूरमध्ये ५६ आणि धुळ्यात ५५ रुग्ण आढळले आहेत. महापालिका क्षेत्रात पुण्यात ७१, मुंबईत ६१, अकोल्यात ४१ आणि कोल्हापुरात ३४ रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबईत रुग्णसंख्या वाढण्याचा धोका
मुंबईत मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने शहर कीटकजन्य आजारांचे प्रमुख हॉटस्पॉट ठरले आहे. पावसाळा आणखी काही काळ कायम राहणार असल्याने डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करणे आणि तापाच्या रुग्णांची वेळीच तपासणी करणे महत्त्वाचे ठरणार आहे. अन्यथा रुग्णसंख्या पुढील काळात वाढण्याचा धोका आहे.