मुंबई : राज्यातील तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण, कृषी, कला, वैद्यकीय अशा विविध शाखांतील अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक सीईटी सेलने बुधवारी जाहीर केले. सीईटीची सुरुवात 24 मार्चपासून एमपी.एड. अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा होणार आहे.
यानंतर अभियंत्रिकी एमएचसीईटीच्या पीसीएम गटाची पहिली परीक्षा 11 ते 19 एप्रिल, तर पीसीबी गटाची पहिली परीक्षा 21 ते 26 एप्रिल या कालावधीत होणार आहे. विद्यार्थ्यांना दिलेल्या अतिरिक्त संधीअंतर्गत पीसीएमच्या दुसऱ्या फेरीच्या परीक्षा 14 ते 17 मे, तर पीसीबीच्या दुसऱ्या फेरीच्या परीक्षा 10 आणि 11 मे रोजी आयोजित केल्या जाणार आहेत.
चालू वर्षी प्रवेश परीक्षेमध्ये 14 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, यामधील 12 लाख 46 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली होती. आगामी शैक्षणिक वर्षातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी असलेल्या 17 प्रवेश परीक्षाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या 12 प्रवेश परीक्षा तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 5 प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहेत.
या प्रवेश परीक्षा सकाळी व दुपारी या सत्रात ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील. तर काही प्रवेश परीक्षा सायंकाळच्या सत्रात देखील घेतल्या जातील. एमएच सीईटी पीसीएम समूहाची पहिली प्रवेश परीक्षा 11 एप्रिल ते 19 एप्रिल 2026 मध्ये होणार असून दुसरी प्रवेश परीक्षा 14 मे ते 17 मे 2026 मध्ये होणार आहे. तर एमएच सीईटी पीसीबी समूहाची पहिली प्रवेश परीक्षा 21 एप्रिल ते 26 एप्रिल 2026 मध्ये होणार असून दुसरी प्रवेश परीक्षा 10 मे व 11 मे 2026 मध्ये होणार आहे. एमबीए/ एमएमएस या अभ्यासक्रमासाठी पहिली प्रवेश परीक्षा 6 एप्रिल ते 8 एप्रिल 2026 मध्ये होणार असून दुसरी प्रवेश परीक्षा 9 मे 2026 मध्ये होणार आहे.