मुंबई: एमएचटी-सीईटी परीक्षेत उमेदवारांचे परीक्षा केंद्र व्यवस्थापन करून गुण वाढवून देण्याबाबत आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात आश्वासन दिल्याचे कथित संभाषण समोर आले आहे.
या ध्वनिफितीप्रकरणी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित ध्वनिफितीची सत्यता पडताळून सखोल चौकशी करण्याची मागणी कक्षाने केली आहे.
सीईटी कक्षाला परीक्षेसंदर्भातील कथित संभाषणाची ध्वनिफीत आणि त्यासंबंधीचा व्हिडीओ प्राप्त झाला होता. या संभाषणात एका महिलेने दूरध्वनीवरून पुरुषाशी बोलताना आर्थिक मोबदला स्वीकारून एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी परीक्षा केंद्राचे व्यवस्थापन करणे, उमेदवाराची परीक्षा नियोजित पद्धतीने पार पाडणे तसेच त्याचे गुण वाढवून देण्याबाबत आश्वासन दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.
संभाषणात आर्थिक व्यवहाराचा उल्लेख असल्याने हा कथित प्रकार गंभीर आणि आक्षेपार्ह असल्याचे सीईटी कक्षाने म्हटले आहे. अशा प्रकारामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर, निष्पक्षतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात कोणत्याही बाधित उमेदवाराकडून अथवा संबंधित व्यक्तीकडून अद्याप लेखी तक्रार प्राप्त झालेली नसल्याचे सीईटी कक्षाने स्पष्ट केले. मात्र, कथित संभाषणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याची सत्यता, संबंधित व्यक्तींची ओळख, संभाषणाची पार्श्वभूमी आणि कथित गैरप्रकारामागील वस्तुस्थिती तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.
ध्वनिफितीची तांत्रिक तपासणी करून संबंधित व्यक्तींची चौकशी करावी आणि प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती पोलिसांना करण्यात आली आहे. तक्रारीसोबत कथित संभाषणाची ध्वनिफीत व व्हिडीओ पेनड्राइव्हमध्ये सादर करण्यात आला आहे.
टाक्स फोर्सची स्थापना
सोशल मीडिया आणि अन्य माध्यमांतून सीईटी परीक्षेबाबत चुकीची, दिशाभूल करणारी, अपूर्ण अथवा असत्य माहिती प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सीईटी कक्षाने त्यावर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या माध्यमातून माहितीची पडताळणी करून आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे