MHADA Mumbai Lottery 2026: मुंबईत स्वतःचं घर घेणं आजही अनेकांसाठी स्वप्नच आहे. भाड्याच्या घरात राहणं, दरवर्षी वाढणारी घरांची किंमत आणि घरासाठी लागणारी मोठी रक्कम, या सगळ्यात सर्वसामान्य माणसाला सर्वात मोठा आधार वाटतो तो म्हणजे म्हाडाच्या लॉटरीचा. आता घरासाठी वाट पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाने सुमारे 3000 घरांची लॉटरी काढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मार्च महिन्यात ही लॉटरी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबईत जागेचे दर इतके वाढले आहेत की मध्यमवर्गीयांसाठी घर खरेदी करणं मोठं आव्हान आहे. अशात म्हाडाची घरं ही तुलनेने कमी किमतीत उपलब्ध होतात. बाजारभावापेक्षा कमी दरात घर मिळण्याची शक्यता असल्यामुळे म्हाडाच्या लॉटरीची लोक आतुरतेने वाट पाहात असतात. गेल्या काही वर्षांमध्ये म्हाडाने मुंबईतील विविध भागांमध्ये सर्वसामान्यांसाठी घरं उपलब्ध करून दिली आहेत.
या लॉटरीमध्ये मुंबईत कोणत्या भागांतील घरांचा समावेश असेल, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. म्हाडाकडून अधिकृत घोषणेनंतरच घरांची ठिकाणं, अर्ज प्रक्रिया, पात्रतेचे निकष आणि दर याबाबत स्पष्ट माहिती मिळेल.
मुंबईबरोबरच म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे 4000 घरांची लॉटरी निघण्याची शक्यता आहे. कोकण मंडळाच्या घरांना मागणी असली तरी काही प्रकल्पांच्या परिसरात रस्ते, पाणी, वीज यांसारख्या सुविधा नसल्याने अनेक तक्रारीही झाल्या आहेत. मात्र आता म्हाडाने पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर दिला असून काही ठिकाणी घरांचे दरही कमी करण्यात आले होते, त्यामुळे पुढील लॉटरीला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असा अंदाज आहे.
म्हाडाने गेल्या अनेक दशकांमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणावर घरनिर्मिती केली आहे. उपलब्ध माहितीनुसार, म्हाडाने आजवर सर्वसामान्यांसाठी सुमारे 9 लाख परवडणारी घरं दिली आहेत. तसंच मुंबईत काही मोठे प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सुरू आहेत किंवा नियोजनाच्या प्रक्रियेत आहेत.
मार्चमध्ये लॉटरी जाहीर होण्याची शक्यता असली तरी सध्या ही माहिती सूत्रांच्या आधारे आहे. त्यामुळे म्हाडाची अधिकृत घोषणा झाल्यावरच अर्जाची तारीख, ऑनलाईन नोंदणी, कागदपत्रे आणि पात्रता याबाबत अंतिम माहिती समोर येईल.