

नमिता धुरी
मुंबई : सर्वप्रथम अर्ज करून त्वरित घर मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या गृहखरेदीदारांचे गृहस्वप्न आचारसंहितेमुळे लांबणीवर पडले आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेची जाहिरात वर्षअखेरीस प्रसिद्ध होणे अपेक्षित होते; मात्र सोमवारी सुरू झालेल्या आचारसंहितेमुळे ही योजना महिनाभर पुढे ढकलावी लागली आहे.
एकूण 125 घरांच्या किमतींच्या प्रस्तावाला म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध केली जाणार होती. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अधिवेशनामुळे इच्छुक अर्जदारांना जाहिरातीची प्रतीक्षा करावी लागली; मात्र त्यानंतर तरी प्रस्तावाला मंजुरी मिळणे अपेक्षित होते. अधिवेशन संपताच आचारसंहिता लागल्यामुळे आता ही योजना लांबणीवर पडली आहे.
या योजनेतील घरांच्या किमती 36 लाख ते 8 कोटी दरम्यान आहेत. महागड्या किमतींमुळेच या घरांची सोडतीत विक्री होऊ शकली नाही. 2017च्या सोडतीत मालाड मालवणी येथील घराची किंमत 18 लाख 62 हजार 639 इतकी होती. 2024च्या सोडतीत ही किंमत 31 लाख होती. आता याच घराची किंमत 36 लाखांहून अधिक आहे. मालाडच्या गायकवाडनगर प्रकल्पातील घराची किंमत 2013 साली 21 लाख 88 हजार 52 होती. गेल्या वर्षी ही किंमत 55 लाख 9 हजार 200 होती. आता त्यात दीड लाखाहून अधिक वाढ झाली आहे. ताडदेवच्या क्रिसेंट टॉवर येथील घरे सर्वाधिक महाग आहेत. योजनेची जाहिरात लांबल्याने इच्छुक अर्जदारांचा भ्रमनिरास झाला आहे.
घरांची सोडत दरवर्षी काढली जाते. त्यातील काही घरे विक्रीविना शिल्लक राहतात. दोनदा सोडत काढल्यानंतरही शिल्लक राहिलेल्या घरांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेद्वारे केली जाणार आहे. सर्वप्रथम अर्ज करणाऱ्या व 10 टक्के रक्कम भरणाऱ्या अर्जदारास घर मिळणार आहे.