म्हाडा घराच्या आमिषाने अनेकांना गंडा घालणाऱ्या मुख्य आरोपीस अटक pudhari photo
मुंबई

MHADA house fraud : म्हाडा घराच्या आमिषाने अनेकांना गंडा घालणाऱ्या मुख्य आरोपीस अटक

मुंबईसह वसईत आठ फसवणुकीचे गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : म्हाडा घराच्या आमिषाने अनेकांना गंडा घालणाऱ्या जितेंद्र सुखलाल राठोड नावाच्या एका मुख्य आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध मुंबईसह वसईतील विविध पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत.

काही महिन्यांपूर्वी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात बेला मेलवीन डिसुझा या महिलेसह इतर आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांतील तक्रारदार महिलेसह इतरांना त्यांनी म्हाडामध्ये ओळख असल्याची बतावणी करुन त्यांना म्हाडाचे स्वस्तात फ्लॅट दाखविण्याचे आमिष दाखविले होते.

याच फ्लॅटसाठी त्यांच्याकडून 2012 ते 2019 या कालावधीत सत्तर लाखांहून अधिक रोकड आणि धनादेशाद्वारे पैसे घेतले होते. त्यानंतर त्यांना म्हाडाचे बोगस वाटपपत्र देऊन त्यांची फसवणूक करुन पलायन केले होते.

या टोळीने अशाच प्रकारे इतर काही ठिकाणी गुन्हे केले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मुंबईसह वसई पोलीस ठाण्यात आठहून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली होती. या गुन्ह्यांचा तपास नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता.

हा गुन्हा हाती येताच पोलिसांनी पळून गेलेल्या बेला डिसुझा हिला अटक केली होती. तिच्या चौकशीतून जितेंद्र हा या कटातील मुख्य आरोपी असल्याचे उघडकीस आले होते. मात्र विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल होताच जितेंद्र हा पळून गेला होता. त्याचा शोध सुरु असताना तो चेंबूर येथील सदगुरु हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या पथकातील एपीआय भूषण देवरे, नितीन पवार, पोलीस अंमलदार मंदार राणे, जयेश अत्तरदे यांनी सदगुरु हॉटेल येथून जितेंद्र राठोड याला ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT