किंमत कपातीनंतरही म्हाडाची २३६ घरे रिक्त pudhari photo
मुंबई

MHADA Housing Scheme : किंमत कपातीनंतरही म्हाडाची २३६ घरे रिक्त

मध्यम उत्पन्न गटाची घरे उच्च उत्पन्न गटानेही नाकारली

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : नमिता धुरी

घरे विकण्यासाठी विविध युक्त्या वापरूनही म्हाडाला घरे विकण्यात अपयश येत आहे. विक्रोळीतील मध्यम उत्पन्न गटाच्या १ हजार २२१ घरांच्या किंमतींमध्ये कपात केल्यानंतर व त्यातील निम्मी घरे उच्च उत्पन्न गटासाठी दिल्यानंतरही अर्जदारांनी घरांकडे पाठ फिरवली असून २३६ घरे रिक्तच राहिली आहेत.

मुंबई मंडळ सोडतीची प्रारूप यादी म्हाडाने बुधवारी प्रसिद्ध केली. यानुसार महागड्या घरांना अर्जदारांचा फारसा प्रतिसाद लाभलेला नाही. संकेत क्रमांक ५३८ मध्ये ४८० तर संकेत क्रमांक ५३९मध्ये ७४१ सदनिका मध्यम उत्पन्न गटासाठी देण्यात आल्या होत्या. मात्र या घरांच्या किंमती दीड कोटींच्या घरात असल्याने येथे अर्जदारांचा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे अर्ज प्रक्रिया सुरू असतानाच म्हाडाने या घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या होत्या.

किंमत कमी केल्यानंतरही या घरांसाठी अर्ज येत नव्हते. त्यामुळे शासन निर्णयाचे उल्लंघन करून यातील निम्मी घरे उच्च उत्पन्न गटाला उपलब्ध करून देण्यात आली. त्यासाठी ५३८ अ आणि ५३९ अ असे स्वतंत्र संकेत क्रमांक दर्शवण्यात आले. मात्र एवढा खटाटोप करूनही म्हाडाला सर्व घरे विकता आली नाहीत. त्यामुळे विक्रोळीतील या दोन्ही संकेत क्रमांकांसाठी अर्ज केलेल्या मध्यम व उच्च उत्पन्न गटातील अर्जदारांना घर लागणार हे निश्चित झाले आहे.

उच्च उत्पन्न गटालाही घरे नकोशी

संकेत क्रमांक ५३८ म्हणजेच मध्यम उत्पन्न गटासाठी २४० सदनिका राखीव असताना येथे केवळ २२८ अर्ज आले. संकेत क्रमांक ५३८ अ म्हणजेच उच्च उत्पन्न गटाच्या २४० सदनिकांसाठी केवळ १७९ अर्ज दाखल झाले. मध्यम गटाच्या संकेत क्रमांक ५३९मध्ये ३७१ सदनिकांसाठी ३५९ अर्ज आले असून उच्च गटाच्या संकेत क्रमांक ५३९ अ मध्ये ३७० सदनिकांसाठी केवळ २१९ अर्ज आले आहेत. त्यामुळे २३६ घरे प्रतिसादाविना रिक्त राहिली आहेत. विशेष म्हणजे उच्च उत्पन्न गटामध्ये घरे नाकारण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे २१२ इतके आहे. त्यामुळे ज्यांच्यासाठी म्हाडाने शासन निर्णयाचे उल्लंघन केले त्याच अर्जदारांनी निराशा केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT