मुंबई: नोकरी-धंद्यानिमित्त मुंबईत येणाऱ्या नोकरदार वर्गाला भाडेतत्त्वावरील घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाने टीसीएसकरवी एका विशेष संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. दिवाळीनंतर हे संकेतस्थळ कार्यान्वित केले जाणार असून यामुळे कमी दरात भाड्याने घर शोधणे सोपे होणार आहे.
'म्हाडा'तर्फे तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य भाडेतत्त्वावरील घरांच्या धोरणात परवडणारी, सर्वसमावेशक, पारदर्शक आणि सुलभ अशी घरे वाटपाची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.
मुंबईत निवासी जागांचा भाडेदर बराच उंचावलेला असताना कमी दरात भाड्याने घर मिळण्याची सोय भाडेतत्त्वावरील घरांच्या संकेतस्थळावर असेल. विद्यार्थी, प्रकल्पग्रस्त, वैद्यकीय व्यावसायिक, विविध उत्पन्न गटातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, पर्यटक, स्थलांतरित कामगार, काम करणाऱ्या महिला व बेघर या सर्वांचा विचार हे संकेतस्थळ तयार करताना करण्यात आला आहे.
या संकेतस्थळाद्वारे भाडेकरू व्यवस्थापन, देखभाल नोंदी, उपलब्ध घरांची माहिती, दस्तऐवज संग्रह, भाडेकरार, ऑनलाइन मुद्रांक शुल्क व नोंदणी यांसारख्या प्रक्रिया मानवी हस्तक्षेपाशिवाय सुलभतेने एकाच ठिकाणी उपलब्ध होतील.
खासगी विकासकांचा सहभाग वाढवण्यासाठी धोरणाच्या मसुद्यात जीएसटी, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, मालमत्ता करात सवलत, विकास शुल्कात सूट, टीडीआरचे फायदे, एफएसआय अटी शिथिल करणे तसेच प्राप्तिकर सवलती यांसारख्या प्रोत्साहनात्मक उपायांचा विचार देखील केला जात आहे.