

मुंबई: अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात बुधवारी (दि. २१ ऑक्टोबर) कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याची तीव्रता २६ पासून वाढणार आहे. दक्षिण भारताच्या किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात मात्र २६ ते २८ दरम्यान हलक्या पावसाचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
उत्तर हिंदी महासागरात बुधवारी चक्रीवादळाची तयारी सुरू झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. त्यानुसार पुढील चोवीस तासांत कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होणार आहे. त्याचे २६ ऑक्टोबरला चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. दक्षिण भारताच्या किनारपट्टीवरील हवेच्या वरच्या थरांत वाऱ्यांची चक्रीय स्थिती तयार झाली आहे.
दोन्ही सागरांत कशी आहे स्थिती?
- नैऋत्य अरबी समुद्रावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम-वायव्य दिशेला सरकले असून, २२ ऑक्टोबर रोजी पश्चिम-नैऋत्य दिशेला सोमालियाच्या किनारपट्टीच्या दिशेने पुढे जाण्याची शक्यता आहे.
- दक्षिण आणि पश्चिम-मध्य अरबी समुद्रावर विखुरलेले ते दाट कमी व मध्यम उंचीचे ढग असून, त्यामध्ये तीव्र ते अतितीव्र संवहन दिसून येत आहे.
- नैऋत्य अरबी समुद्र आणि आसपासच्या भागात एक चक्राकार प्रणाली असून, पश्चिम-मध्य आणि दक्षिणअरबी समुद्र, विषुववृत्तीय हिंदी महासागर क्षेत्रात विखुरलेले ते मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे.
- कमी, मध्यम उंचीचे ढग आहेत. यामध्ये तीव्र ते अतितीव्र स्वरूपाची संवहन प्रक्रिया सुरू असून, ढगांच्या वरच्या भागाचे तापमान उणे ७० ते उणे ९० अंश सेल्सिअस इतके कमी आहे.
- वाऱ्याचा कमाल वेग १५ नॉट्स असून, तो २५ नॉट्सपर्यंत वाढू शकतो. हवेचा दाब १००९ हेप्टोपास्कल इतका आहे.
- विविध संख्यात्मक मॉडेल्सवरून असे सूचित होते की, 'मॅडेन ज्युलियन ऑसिलेशन' (एमजेओ) सध्या तिसऱ्या टप्प्यात असून, त्याचे आयाम १ च्या जवळ आहे. पुढील ७ दिवस ते याच टप्प्यात राहण्याची शक्यता आहे.
- अशाप्रकारे पुढील ७ दिवसांत उत्तर हिंदी महासागरात ज्यामध्ये बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राचा समावेश होतो. संवहनी क्रिया वाढण्यासाठी आणि चक्रीवादळ निर्मितीसाठी एमजेओची स्थिती अनुकूल आहे.