Jogeshwari Meghwadi pipeline issue Pudhari
मुंबई

Jogeshwari Meghwadi pipeline issue: मेघवाडीत पाईपलाईन कामामुळे कचरा, राडारोड्याचा डोंगर

उघड्यावर सडणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त ; तीव्र दुर्गंधीने बेजार

पुढारी वृत्तसेवा

जोगेश्वरी: जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडी परिसरात मागील महिन्यापासून सुरू असलेल्या पाईपलाईन टाकण्याच्या कामामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड नरकयातना सहन कराव्या लागत आहेत.

पाईपलाईनसाठी रस्ता खणल्यानंतर त्यातून निघालेला राडारोडा आणि मोठ्या प्रमाणावर साचलेला कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने संपूर्ण परिसरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सिमेंटच्या गोण्या, दगड, माती आणि प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रचंड ढीग साचल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला असून पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे.

स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, पाईपलाईनचे काम सुरू झाल्यापासून कंत्राटदाराकडून स्वच्छतेच्या नियमांना हरताळ फासला गेला आहे. सध्याच्या कडक उन्हामुळे उघड्यावर टाकलेल्या या कचऱ्याची प्रचंड हेडसांळ झाली असून, संपूर्ण मेघवाडी परिसरात असाह्य आणि जीवघेणी दुर्गंधी पसरली आहे.

या अस्वच्छतेमुळे डास, माश्या आणि कीटकांचा प्रादुर्भाव वाढला असून परिसरात साथीच्याआजारांचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

नियमांनुसार सार्वजनिक रस्त्यावर काम करताना नागरिकांची सुरक्षितता आणि स्वच्छता राखणे कंत्राटदारावर बंधनकारक असते. मात्र, मेघवाडीतील या कामाच्या ठिकाणी कचरा व राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा नसल्याचे दिसत आहे. ढिगाऱ्याशेजारूनच रिक्षा आणि दुचाकी वाहने कसरत करत जात असल्याने अपघाताची भीतीही वाढली आहे.

‌‘आम्हाला घरात राहणे आणि रस्त्यावरून चालणे असाह्य झाले आहे. पाईपलाईनच्या कामाला आमचा विरोध नाही, परंतु त्यामुळे निर्माण होणारा कचरा आणि राडारोडा तात्काळ उचलला गेला पाहिजे,‌’ अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ता संदिप कसालकर यांनी व्यक्त केली.

संबंधित कंत्राटदाराच्या या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभाराची महापालिका प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी आणि साचलेला कचरा व राडारोडा युद्धपातळीवर हटवून मेघवाडीतील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT