मुंबई : वैद्यकीय मूल्यांकन आणि क्रमवारी मंडळाच्या (एमएआरबी) निर्णयाविरोधात दाखल झालेल्या अपीलांवर विचार करून राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या समितीने आणखी 245 पदव्युत्तर वैद्यकीय जागांना मंजुरी दिली आहे. यापूर्वी याच प्रक्रियेतून 171 जागांना मान्यता देण्यात आली होती. या वाढीव जागांचा समावेश थेट पीजी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत करण्यात येणार असल्याचे एनएमसीने स्पष्ट केले आहे.
शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी एमएआरबीने मंजूर केलेल्या जागांबाबत काही वैद्यकीय महाविद्यालयांनी एनएमसी अधिनियम 2019 च्या कलम 28(5) अंतर्गत अपील दाखल केले होते. या अपीलांवर सविस्तर विचारविनिमयानंतर प्रथम अपील समितीने 245 जागांना अंतिम मंजुरी देण्याचा निर्णय घेतला. या जागांसाठीचे लेटर ऑफ परमिशन (एलओपी) लवकरच संबंधित महाविद्यालयांना जारी करण्यात येणार आहेत.
या निर्णयाचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांना झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 53 नव्या जागांना मान्यता मिळाली असून, त्याखालोखाल तेलंगणाला 41, राजस्थानला 26, बिहारला 21, उत्तर प्रदेशला 16 आणि दिल्लीला 14 जागा मंजूर झाल्या आहेत. महाराष्ट्रात सोलापूर, नागपूर, सांगली, अमरावती, नवी मुंबई आणि जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विविध पीजी अभ्यासक्रमांत ही वाढ झाली आहे.
विशेषतः सामान्य वैद्यकशास्त्र (जनरल मेडिसिन), रेडिओ निदानशास्त्र, जनरल सर्जरी, त्वचारोगशास्त्र आणि बालरोगशास्त्र या अभ्यासक्रमांमध्ये महाराष्ट्रात लक्षणीय जागावाढ झाली आहे. एनएमसीच्या या निर्णयामुळे देशातील तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता कमी होण्यास हातभार लागणार असून, वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांना बळकटी मिळणार आहे. आगामी समुपदेशन प्रक्रियेत या वाढीव जागांचा थेट लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रवेशाच्या तिसर्या यादीत या जागावर प्रवेश मिळणार आहे.
दरम्यान, समुपदेशन प्रक्रियेत विलंब होऊ नये, यासाठी समुपदेशन प्राधिकरणांनी एलओपीची प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नसल्याचे एनएमसीने स्पष्ट केले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली जागावाढीची यादीच समुपदेशनासाठी वैध मानली जाणार आहे.
सामान्य वैद्यकशास्त्र 62, रेडिओ निदानशास्त्र 39, शस्त्रक्रिया शास्त्र 30, त्वचारोग, लैंगिक रोग व कुष्ठरोग 30, बालरोगशास्त्र 22, प्रसूती व स्त्रीरोगशास्त्र 11, अस्थिरोगशास्त्र 9, कान-नाक-घसा रोगशास्त्र 9, नेत्ररोगशास्त्र 6, मानसोपचारशास्त्र 5, भूलशास्त्र 4, श्वसनरोगशास्त्र 4, किरणोपचार ऑन्कोलॉजी 3, आपत्कालीन वैद्यकशास्त्र 3, जैवरसायनशास्त्र 2, कौटुंबिक वैद्यकशास्त्र 2, समाजवैद्यकशास्त्र 2, सूक्ष्मजीवशास्त्र 2 अशा 245 जागा वाढल्या.