Measles Outbreak Mumbai Pudhari
मुंबई

Measles Outbreak Mumbai: मुंबईत गोवरचा धोका वाढला; 64 मुलांना संसर्ग, गोवंडी-धारावीमध्ये रुग्ण जास्त

लसीकरण न झालेल्या मुलांमध्ये संसर्ग; महापालिकेची विशेष लसीकरण मोहीम व देखरेख वाढवली

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत काही मुलांनी गोवरची लस न घेतल्यामुळे त्यांना गोवरची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांत मुंबई आणि ‌‘एमएमआर‌’क्षेत्रातील 64 मुलांना गोवरची लागण झाल्याने कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, गोवंडी आणि धारावी परिसरात रुग्णांची संख्या तुलनेने जास्त असून या भागांत देखरेख वाढवण्यात आली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने येथे लसीकरण मोहीम आणि जनजागृती वाढवली आहे.

या संदर्भात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली असून, लसीकरण न झालेल्या मुलांमध्ये संसर्गाचा धोका अधिक असल्याचे स्पष्ट केले आहे.

पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.दक्षा शहा यांनी सांगितले की, मार्च महिन्यात एम-पूर्व वॉर्ड (गोवंडी) परिसरात सुमारे पाच रुग्ण, तर जी-नॉर्थ वॉर्ड (धारावी) परिसरात चार ते पाच रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही भागांत आरोग्य यंत्रणेने सक्रिय देखरेख सुरू केली असून लसीकरणावर विशेष भर दिला जात आहे.

याशिवाय स्थानिक प्रभावशाली व्यक्ती आणि धार्मिक नेत्यांच्या मदतीने लसीकरणाबाबत जनजागृती मोहीम राबवली जात आहे. पालकांनी आपल्या मुलांचे लसीकरण केले नसेल, तर जवळच्या बीएमसी दवाखाना, आरोग्य चौकी किंवा रुग्णालयात जाऊन लस घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. पालिकाकडून गोवरची लस मोफत उपलब्ध आहे.

दरम्यान, पालकांनी आपल्या मुलांचे लसीकरण वेळेत पूर्ण करून घ्यावे तसेच गोवरची लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

गोवर म्हणजे काय?

गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. तो प्रामुख्याने मुलांमध्ये आढळतो आणि श्वसनमार्गातून सहज पसरतो. वेळेवर लसीकरण केल्यास या आजारापासून प्रभावी संरक्षण मिळू शकते.

प्रमुख लक्षणे :

गोवर हा अत्यंत संसर्गजन्य आजार असून तो प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळतो. संक्रमित व्यक्तीच्या खोकला किंवा शिंकांमधून हा आजार वेगाने पसरतो. ताप, खोकला, सर्दी, डोळे लाल होणे तसेच शरीरावर लाल पुरळ येणे ही गोवरची प्रमुख लक्षणे मानली जातात.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, गोवरपासून बचाव करण्यासाठी मुलांना वेळेवर लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. लसीकरण न झाल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो आणि आजाराची गुंतागुंतही वाढण्याची शक्यता असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT