मुंबई ः राज्यात यंदाच्या वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांच्या प्रवेशात मोठी चढाओढ पहायला मिळाली आहे. सलग सहा फेरीनंतर राज्यातील एकूण 8 हजार 535 एमबीबीएस जागा शंभर टक्के भरल्या गेल्या यात शासकीय महाविद्यालयातील 4 हजार 936 आणि खासगी महाविद्यालयातील 3 हजार 599 जागा भरल्या आहेत. तर बीडीएस अभ्यासक्रमांतील 2 हजार 718 जागा होत्या, त्यापैकी 2 हजार 711 जागांवर प्रवेश झाले आहेत. केवळ 7 जागा रिक्त राहिल्या. यापैकी शासकीय महाविद्यालयातील 318 पैकी 312 प्रवेश झाले आहेत. यामुळे तब्बल 6 जागा रिकामी राहिल्या तर खाजगी 2,400 पैकी 2,399 प्रवेश झाल्याने एक जागा रिकाम्या राहिल्या आहेत.
नीटच्या गुणावर प्रवेश होत असलेल्या एमबीबीएस आणि बीडीएस टॉप महाविद्यालयातील या जागा पटकवण्यासाठी यंदाही नीट पात्रधारकांच्या गुणवत्तेचा कस लागलेला पहायला मिळाला. टॉप लिस्टवर असलेल्या शासकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी यंदाही निर्णायक संघर्ष यंदाही कायम राहिला. यामुळेच यंदाची प्रवेश प्रक्रिया तब्बल सहा फेरीतील प्रवेशप्रक्रिया शेवटच्या फेरीपर्यंत प्रचंड चढ-उतारानंतर पूर्ण झाली. शासकीय महाविद्यालयांच्या 4 हजार 936 जागा आणि खासगी महाविद्यालयांच्या 3 हजार 599 जागा भरल्या गेल्याने यंदाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची असलेली चुरस कायम दिसली.
विद्यार्थ्यांच्या पसंतीक्रमातील बदल, सततची पुनर्निवड आणि स्ट्रे राऊंडमधील गुण आणि प्रवेश मिळेल तिथे अर्ज अशा वेगवान हालचाली विद्यार्थ्यांनी केल्यामुळे पहिल्या फेरीनंतर शेकडो-हजारो जागा रिकाम्या असताना अखेरच्या फेरीपर्यंत चुरस होवून सर्व जागा भरल्याचे चित्र दिसले.
बीडीएस अभ्यासक्रमांतील 318 जागांपैकी 312 भरल्या, तर खाजगी महाविद्यालयातील 2 हजार 400 पैकी तब्बल 2 हजार 399 प्रवेश पूर्ण झाले. म्हणजेच राज्यभर केवळ सातच जागा रिकामी राहिल्या. पहिल्या फेरीत हजाराहून जास्त रिकाम्या असताना अंतिम टप्प्यात जोरदार चुरस पहायला मिळाली.
सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या 4 हजार 936 एमबीबीएस जागा तर शेवटच्या स्ट्रे राऊंडमध्ये पूर्णपणे भरल्या गेल्या. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनीही आपल्या 3 हजार 599 जागा शंभर टक्के भरल्या.
यंदा नीटमध्ये चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय आणि दंत शिक्षणाला प्राधान्य दिले. त्यातच समुपदेशन आणि स्ट्रे राऊंड्समधील विद्यार्थ्यांनी घेतेलेले जलद निर्णय यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा भरता आल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली.
जागा वाढल्या तरीही प्रवेशाला उड्या
गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात तब्बल 437 जागांची वाढ होऊनही प्रवेशप्रक्रिया जवळपास शंभर टक्के क्षमतेने पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी (2024-25) राज्यात एमबीबीएस आणि बीडीएस मिळून 10 हजार 816 जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी सर्व एमबीबीएसच्या जागा भरल्या होत्या आणि बीडीएस मध्ये फक्त तीन जागा रिकाम्या राहिल्या होत्या. यंदा मात्र जागावाढीने प्रवेशप्रक्रियेला अधिक स्पर्धात्मक रूप प्राप्त झाले. एमबीबीएसमध्ये तब्बल 394 जागांची वाढ झाली आणि एकूण क्षमता 8 हजार 141 वरून 8 हजार 535 इतकी झाली. या सर्व जागा भरल्या आहेत.
बीडीएस अभ्यासक्रमाच्या 43 जागांची वाढ होऊन क्षमता 2,675 वरून 2,718 झाली. गतवर्षीच्या जागांपैकी 2 हजार 672 प्रवेश झाले होते, तर यंदा 2 हजार 718 जागांपैकी 2 हजार 711 प्रवेश झाले. म्हणजेच जागा वाढल्या मात्र गेल्यावर्षी पेक्षा रिकामी जागा 4 जास्त राहिल्या आहेत. यंदा राज्यातील दोन्ही अभ्यासक्रमात मिळून 11 हजार 253 जागांपैकी 11,246 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.