मुंबई : गिरगाव परिसरात मध्यरात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अचानक वीज गेल्याने अनेक रहिवाशांची झोपमोड झाली असून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाणारे नागरिक आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्याचा सर्वाधिक फटका उंच इमारतींमधील रहिवाशांना बसला आहे. लिफ्ट बंद पडल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना अनेक मजले चढ-उतार करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः दहाव्या, पंधराव्या किंवा त्याहून अधिक मजल्यांवर राहणाऱ्या नागरिकांची गैरसोय वाढली आहे.
वीजपुरवठा बंद असल्यामुळे पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. अनेक इमारतींमध्ये पाण्याच्या मोटारी बंद पडल्याने नळांना एक थेंबही पाणी आलेले नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन गरजांसाठीही नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे.
काही गृहनिर्माण संस्थांनी जनरेटरच्या सहाय्याने तात्पुरता वीजपुरवठा सुरू केला असला, तरी अनेक इमारती आणि टॉवर अद्यापही अंधारात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
वीजपुरवठा नेमका कशामुळे खंडित झाला आणि तो पूर्ववत कधी होणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, वीज वितरण यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून लवकरात लवकर पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, वीज आणि पाणी या दोन्ही मूलभूत सुविधांअभावी गिरगावकरांचे मोठे हाल होत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.