मुंबई

Women Day Special Stories: स्वकर्तृत्वाने देशपातळीवर झळकलेल्या मराठी महिला; विविध क्षेत्रांत महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल

महिला दिन विशेष : प्रशासन, राजकारण, क्रीडा आणि अर्थक्षेत्रात यशाची शिखरे गाठणाऱ्या मराठी महिलांची प्रेरणादायी कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

स्वकर्तृत्वाने महाराष्ट्राचे नाव देशात मोठे करणाऱ्या मराठी महिला

विजया रहाटकर, अध्यक्षा, राष्ट्रीय महिला आयोग

छत्रपती संभाजीनगरच्या माजी महापौर विजया रहाटकर सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. आयोगाच्या माध्यमातून महिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून देणे, देशभरात विविध ठिकाणी जनसुनावणीसारखे उपक्रम घेणे, सर्व प्रकरणे लवकर निकाली काढणे या गोष्टी प्रामुख्याने त्यांच्या नेतृत्वात केल्या जात आहेत. यासह ‌‘तेरे मेरे सपने‌’ नावाने विवाहपूर्व संवाद केंद्र, राष्ट्रीय महिला आयोग आपल्या द्वारी अशा वेगवेगळ्या योजना त्यांनी विशेष करून अंमलात आणल्या. त्यांची अंमलबजावणी देशभरात प्रभावीपणे व्हावी, यासाठी स्वतः लक्ष घातले. यंदाच्या महिलादिनी त्यांनी राष्ट्रीय स्तरावर महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी देशव्यापी जनसुनावणी कार्यक्रम हाती घेतला आहे.

रक्षा खडसे, केंद्रीय युवक कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री

रक्षा खडसे या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय युवक कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्या जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा क्षेत्राचे सलग तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी सर्व क्रीडा प्रशिक्षकांमध्ये महिला प्रशिक्षकांना 33 टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत स्थानिक स्तरावरील नेतृत्वापासून राष्ट्रीय पातळीवरील जबाबदाऱ्यांपर्यंतचा प्रवास उल्लेखनीय आहे. अलीकडेच महिला दिनाच्या निमित्त त्यांनी क्रीडा क्षेत्रातील महिलांच्या सहभागाला चालना देण्यासाठी ‌‘अस्मिता महिला क्रीडा लीग‌’ची विशेष आवृत्ती जाहीर केली असून, ग्रामीण भागातील 2.5 लाख मुली यात सहभागी होणार आहेत.

सुप्रिया देवस्थळी, सहमहालेखानियंत्रक, भारत सरकार

सुप्रिया देवस्थळी दिल्लीस्थित नामवंत मराठी अधिकारी (आयसीएएस) असून, भारत सरकारच्या सहमहालेखानियंत्रक म्हणून कार्यरत आहेत. मूळच्या सिंधुदुर्गातील असलेल्या सुप्रिया देवस्थळी यांनी शिक्षण मुंबईतून पूर्ण केले. मार्च 2018 पासून त्या दिल्लीत आहेत. आयसीएएस असोसिएशनच्या स्थापनेपासून त्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत. यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी त्या मार्गदर्शन करतात. दिल्लीस्थित मराठी अधिकाऱ्यांची संस्था ‌‘पुढचं पाऊल‌’, दिल्ली मराठी प्रतिष्ठान यांच्यातही त्या सक्रिय आहेत. दिल्लीत होत असलेल्या मराठी महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनाच्या त्या स्वागताध्यक्षा आहेत.

प्रतिभा पारकर, संयुक्त सचिव, परराष्ट्र मंत्रालय

प्रतिभा पारकर या भारतीय परराष्ट्र सेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत. सध्या त्या परराष्ट्र मंत्रालयात नवी दिल्ली येथे संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. मूळच्या मुंबईच्या असलेल्या प्रतिभा यांनी 2000 मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी मॉस्को येथील भारतीय दूतावासात राजनैतिक अधिकारी म्हणून काम केले. फ्रँफर्ट येथे भारताच्या वाणिज्य दूतावासात महावाणिज्यदूत म्हणून त्यांनी सेवा दिली. परदेशात सेवा देताना कोरोना काळात तसेच इतर संकटकाळात विविध देशांत अडकलेल्या भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. ऑगस्ट 2023 मध्ये त्या भारतात परतल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत.

धनश्री देशमुख, सनदी लेखापाल, संचालक, स्वदेश्री ॲडव्हायजरी सर्व्हिसेस

धनश्री देशमुख दिल्लीस्थित सनदी लेखापाल आहेत. मूळच्या नाशिकच्या असलेल्या धनश्री स्वदेश्री ॲडव्हायजरी सर्व्हिसेस कंपनीच्या संचालक आहेत. महिला सक्षमीकरणासाठीदेखील या संस्थेंतर्गत काम केले जाते. 20 पेक्षा अधिक कर्मचारी या ठिकाणी काम करतात. भारतभरातील महिला उद्योजक आर्थिक स्वावलंबन आणि अंतरिक समतोल साधून आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत 2047 या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत प्रगती करतील, ही त्यांची कल्पना आहे. दिल्लीतील विविध सार्वजनिक कार्यक्रमात त्या आवर्जून सहभागी असतात. मागील काही वर्षांत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, भरत जाधव यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी अतिशय उत्तम केले.

शब्दांकन : प्रशांत वाघाये, नवी दिल्ली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT