Marathi Movie Ticket Price Cap In Maharashtra Multiplex
मुंबई : राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांसाठी कायमस्वरूपी स्क्रीन राखून ठेवावी आणि तिकीट दर सर्वसामान्यांना परवडतील असे 100 ते 150 रुपयांदरम्यान ठेवावेत या प्रमुख मागणीसह चित्रपट संघटनेच्या मागण्यांसंदर्भात मंगळवारी गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. संघटनेने केलेल्या मागण्या मान्य केल्या जातील, असे संकेत मिळाल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीला पोलिस महानिरीक्षक, मनसे नेते अमेय खोपकर, दिग्दर्शक महेश मांजरेकर, बाबासाहेब पाटील, सुशांत शेलार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे मेघराज भोसले आदी चित्रपटसृष्टीतील प्रतिनिधी तर मल्टिप्लेक्स मालक व प्रतिनिधी म्हणून मयांक श्रॉफ, पुष्कराज चाफळकर, थॉमस डिसूजा आणि राजेंद्र जाला उपस्थित होते.
यावेळी बैठकीमध्ये राज्यातील मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये मराठी चित्रपट दाखवण्यासाठी आखण्यात आलेल्या धोरणाबाबतही सविस्तर चर्चा झाली. त्याचबरोबर मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना प्राधान्य देणे, तिकीट दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात ठेवणे, तसेच नवीन धोरण व्यावहारिक आणि उद्योगहिताचे असावे याबाबत विस्तृत चर्चा झाली. विशेषतः प्रत्येक मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांसाठी किमान एक स्क्रीन कायमस्वरूपी राखून ठेवणे या मागणीवर चित्रपट निर्मात्यांनी आग्रही भूमिका घेतली.
बैठकीबाबत बोलताना सुशांत शेलार यांनी सांगितले की, मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये चार स्क्रीन असतील तर त्यामधील एक स्क्रीन कायमस्वरूपी मराठी चित्रपटांसाठी राखून ठेवावा, त्याचबरोबर मराठी चित्रपटांची हिंदी चित्रपटांची तुलना न करता किमान एक आठवडा तरी मराठी चित्रपट थिएटरमध्ये ठेवावा, मल्टिप्लेक्स थिएटरमधील खाद्यपदार्थांचे दर कमी करावेत, अशी आम्ही मागणी केली. या बैठकीनंतर सकारात्मक अंमलबजावणी होईल, असा विश्वास वाटतो, असेही ते म्हणाले.
प्रत्येकाने आपले प्रश्न आणि अडचणी मांडल्या असून बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली. सरकारच्या वतीने उपस्थित प्रशासकीय अधिकार्यांनी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांवर लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही दिले आहे.महेश मांजरेकर, निर्माते
राज्य सरकारने पहिल्यांदा मराठी चित्रपटांच्या शोबाबत गांभीर्याने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मराठी चित्रपटांचा ट्रेलर किमान पंधरा दिवस तरी मल्टिप्लेक्समध्ये थिएटर्समध्ये दाखवावा, मराठी चित्रपटांना सुरुवातीचे काही दिवस प्राईम टाईम द्यावा, या आमच्या मुख्य मागण्या आम्ही मांडल्या आहेत. इतर मुद्द्यांवरही सकारात्मक चर्चा झाली.समीर दीक्षित, चित्रपट वितरक