Pratap Sarnaik on Marathi Mandatory for Rikshaw Tax Driver
मुंबई: "रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर मराठी भाषा सक्तीसाठी कारवाई करणार नाही, पण त्यांना मराठी आलीच पाहिजे, यासाठी आमची मोहीम सुरू राहील. मराठी शिकण्यासाठी १०० दिवसांची मुद्दतवाढ देण्यात आली असून परवाना रद्द होणार नाही," असे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज (दि. २८) स्पष्ट केले. आरटीओ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी मंत्री सरनाईक म्हणाले की, "रिक्षा-टॅक्सी संघटना प्रतिनिधींची काल बैठक पार पडली. सर्व संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ओला, उबेर चालकांना देखील मराठी भाषा अनिवार्य आहे. संघटनांनी मुदतवाढीची मागणी केली होती. त्यानुसार १०० दिवसांची मुद्दतवाढ देण्यात आली आहे. मात्र, १ मे ते १५ ऑगस्ट पर्यंत मराठी भाषा सक्तीची मोहिम सुरू राहील. राज्यातील सर्व ५९ आरटीओला तसे निर्देश देण्यात आले आहेत. मराठी भाषेसाठी आम्ही आता कारवाई करणार नाही. पण मराठी त्यांना बोलावी लागेल," असे सरनाईक म्हणाले.
ज्या संघटनांनी मागणी केली आहे की, आम्ही मराठी भाषा शिकायला तयार आहोत त्यांच्यासाठी आरटीओ कार्यालयात जागा उपलब्ध करणार आहोत. त्यामुळे मराठी भाषा येत नसेल तर लायसन्स १५ ऑगस्टपर्यंत रद्द होणार नाही. चालकांनी मराठी शिकावी यासाठी परिवहन विभाग शंभर दिवस मोहीम राबवणार असून त्यांच्यासाठी उद्या कॅबिनेट बैठकीत पुस्तक प्रकाशन करणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.