मुंबई :मराठा आरक्षण मोर्चाच्या वेळी आझाद मैदान व आजूबाजूच्या परिसरात झालेला कचरा साफ करण्यासाठी महापालिकेला अवघा साडे चौदा लाख रुपये खर्च झाला होता. तीन कंत्राटदारांमार्फत ही स्वच्छता करण्यात आली. याबाबतच्या खर्चाचे विवरण पत्र प्रशासनाने जाहीर केले आहे.
मराठा आरक्षणासाठी लाखो मराठ्यांनी मुंबई, आझाद मैदान येथे धडक दिली होती. यावेळी उसळलेल्या गर्दीमुळे ठिकठिकाणी आंदोलकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे अस्वच्छता झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे महापालिकेने आझाद मैदान व आजूबाजूच्या परिसर स्वच्छ करण्यावर भर दिला होता. 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत आझाद मैदान येथे मराठा आरक्षणाकरिता आंदोलक मोठया संख्येने उपस्थित होते.
आझाद मैदानाजवळील विविध ठिकाणी आंदोलकांमुळे कचरा साचला होता. त्यामुळे कामानिमित्त दक्षिण मुंबईत येणाऱ्या मुंबईकरांचं आजूबाजूच्या शहरातील नागरिकांची गैरसोय झाली होती. परंतु स्वच्छता हे महानगरपालिकेचे प्रमुख कर्तव्य असल्याने, परिसरात स्वच्छता राबवण्यात आल्याचे पालिकेच्या घनकचरा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
अस्वच्छ झालेल्या परिसराची स्वच्छता तातडीने करणे आवश्यक असल्यामुळे तीन कंत्राटदारांची स्वतंत्रपणे नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार प्रत्येकाला कंत्राट वाटून देण्यात आले. या कंत्राटामध्ये परिसर स्वच्छ करण्यासह जमा झालेल्या कचरा वाहून नेणे व अन्य कामे कंत्राटदारामार्फत करण्यात आली. त्यामुळे आंदोलन सुरू असताना व आंदोलन संपल्यानंतर कुठेही फारशी अस्वच्छता दिसून आली नसल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे.