Manoj Jarange Patil
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानातील आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आपला निर्धार कायम ठेवला आहे. जोपर्यंत सरसकट मराठे कुणबी असल्याचा जीआर काढला जात नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्या उपोषणाला आजही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हजारो मराठा आंदोलक आजही आझाद मैदानात एकवट आहेत. जोपर्यंत विजयी गुलाल उधळणार नाही, तोपर्यंत गावी जाणार नाही, अशी भूमिका आंदोकांची असलेली पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला कुणबी ठरवून ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील शुक्रवारपासून बेमुदत उपोषणास बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ मुंबईत मराठा आंदोलकांचे जत्थे धडकत असून, मुंबईची वाहतूक कोंडी आता वाढत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शनिवारी राज्य सरकारने थेट न्या. संदीप शिंदे समितीला आझाद मैदानात पाठवले. तत्पूर्वी मराठा समाजाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या उपसमितीचा निर्णय घेऊनच न्या. शिंदे समिती उपोषणस्थळी पोहोचले. जरांगे पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली. राज्यात मराठा समाजाच्या ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्याने मराठा आणि कुणबी एकच असल्याचा आदेश काढा आणि त्यांना सरसकट कुणबी दाखले द्या, अशी मागणी जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे.
शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसमितीचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात गुप्त बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या मागण्यांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीने ठाम भूमिका घ्यावी, असे आदेश दिले आहेत. जवळपास एक तास त्यांच्यात चर्चा झाली. दोन दिवसात यावर निर्णय घ्यावा व उपसमितीने जरांगे यांची भेट घ्यावी, अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
आंदोलनाच्या आज तिसऱ्या दिवशीही आंदोलकांचे हाल सुरू आहेत. आंदोलक मोठ्या संख्येने दाखल होत असताना तुलनेत तोकड्या सुविधा आहेत. आजतर अनेक आंदोलकांनी रस्त्यावरच आंघोळ केली. सरकारकडून जाणीवपूर्वक आपल्या गैरसोयी होत आहेत, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.
पोलिसांनी दुसऱ्या दिवशीही परवानगी दिली होती. त्यानंतर आज तिसऱ्या दिवशीही मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी दिलेली आहे. याबाबत आंदोलकांच्या वतीने रितसर आझाद मैदान पोलिसात अर्ज करण्यात आला होता. त्यामुळे राज्यभरातून मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत पोहोचले आहेत. जरांगेंना एक एक दिवस अशी परवानगी घेण्यासाठी रीतसर अर्ज करावा लागणार आहे
आझाद मैदानात मराठा बांधवांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्यभरातून भाकरी, चहा नाश्ता दाखल झाला आहे. आठ हजार भाकरी, चपात्या पाठवण्यात आल्या आहेत. दोन दिवसांमध्ये मराठा बांधवांची गैरसोय झाली होती. त्यामुळे राज्यभरातला मराठा बांधव उपाशी राहू नये, म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबईत शनिवारपासून पाऊसही सुरू आहे. मराठा आरक्षण आंदोलकांपैकी काहींनी वाहनातच स्वयंपाक केला तर काहींना मुंबईत वाडीबंदरला पोहोचल्यावर खाण्यापिण्याची प्रचंड आबाळ झाली आणि त्यांना उपाशी राहावे लागले. मराठा आंदोलकांपैकी काही आंदोलक गेल्या दोन दिवसांपासून प्रवास करून मुंबईत पोहोचले आहेत. काही आंदोलकांनी काही दिवस मुक्काम होणार हा अंदाज बांधत मोठ्या आपआपल्या वाहनांमध्ये गॅस, शेगडी, जेवणाचे साहित्य घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. गेले दोन दिवस त्यांनी आपल्या वाहनातच न्याहारी केली आहे.
सीएसएमटी परिसरात आंदोलन सुरू असतानाच लातूरच्या टाकळगावचा (अहमदपूर) रहिवासी असलेला मराठा आंदोलक विजय घोगरे याचा शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीही पुण्यात शिवनेरीजवळ एका मराठा आंदोलकाचा असाच हृदयविकाराने मृत्यू झाला. सरकारने आमचे दोन बळी घेतल्याची तीव्र प्रतिक्रया मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.