Manoj Jarange Patil file photo
मुंबई

Manoj Jarange-Patil : ‘आरक्षणाची विजयी यात्रा नाहीतर माझी अंत्ययात्रा’ मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

Maratha Reservation : ही धमकी नाही, तर मी महाराष्ट्राच्या हिताचे सांगत आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेले आंदोलक नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईत आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारला स्पष्ट शब्दांत इशारा देत आरक्षणासाठी निर्णायक लढ्याची घोषणा केली. ‘मुंबईतून एकतर आरक्षणाची विजयी यात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा,’ अशा शब्दांत जरांगे यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.

‘फडणवीसांच्या आडमुठेपणामुळे मराठे मुंबईत आले’

जरांगे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला. ‘फडणवीसांच्या आडमुठेपणामुळेच मराठा समाज मुंबईपर्यंत पोहोचला आहे. आम्हाला गोळ्या घातल्या तरी आम्ही ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’ असे ठामपणे सांगत त्यांनी सरकार आरक्षण देण्यात वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला. शांततेत मोर्चा काढूनही फक्त अपमानच वाट्याला आल्याचे सांगत त्यांनी सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

शिंदे समितीचा अहवाल स्वीकारा, सरसकट आरक्षण द्या

जरांगे यांनी शिंदे समितीचा अहवाल स्वीकारून मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्याची मागणी केली. जर न्यायालयाच्या निर्णयामुळे 'सरसकट' हा शब्द वापरण्यास अडचण येत असेल, तर सरकारने २०१२ च्या कायद्यानुसार कुणबी ही मराठाची पोटजात आहे असा जीआर काढून मराठ्यांना आरक्षण द्यावे, असे म्हटले.

‘ही धमकी नाही, महाराष्ट्राच्या हिताचे सांगतोय’

जरांगे यांनी सरकारला थेट इशारा देताना सांगितले की, जर आंदोलकांना मुंबईच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही मंत्र्यांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवू. तसेच, मुंबईची आर्थिक नाकेबंदी करण्याचा इशारा देत ते म्हणाले, ‘एकदा जर या लढ्याचे परिणाम सुरू झाले, तर तुम्हाला ते रोखता येणार नाहीत. ही धमकी नाही, तर मी महाराष्ट्राच्या हिताचे सांगत आहे. कोणत्याही समाजाच्या सहनशीलतेची एक मर्यादा असते.’

‘निवडून येण्यासाठी सत्ताधारी पक्षांना मराठा समाजाचीही गरज आहे. तुम्ही किती दिवस समाजाचा अंत पाहणार आहात?’ असा सवाल करत त्यांनी सरकारला लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आवाहन केले.

आंदोलकांना शिस्तीचे आवाहन

या पत्रकार परिषदेत जरांगे यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही प्रकारचा त्रास न देण्याचे आवाहन केले. सत्ताधारी किंवा विरोधकांचे कोणीही प्रतिनिधी भेटायला आले, तर त्यांना सन्मानाने माघारी पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, मराठा आंदोलकांनी पत्रकारांना कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नये, अशा सूचना त्यांनी दिल्या.

दरम्यान, जरांगे यांच्या आंदोलनाला सोमवार (दि. 1) रोजी चौथ्या दिवशीही परवानगी मुंबई पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे हा मराठा आरक्षणाचा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT