

Manoj Jarange hunger strike
ऐन गणेशोत्सवात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरु आहे. आज (दि. ३१) दुपारी खासदार सुप्रिया सुळे यांनी जरांगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्या जात असताना मराठा आरक्षण आंदोलकांनी घेराव घातला. यावेळी काहींनी सुळे यांच्या कारवर पाण्याच्या बाटल्या फेकत शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. त्यामुळे येथील वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. त्यांनी चर्चा करुन आंदाोलनास पाठिंबाही दिल्या. यानंतर त्या उपोषणस्थळावरुन निघाल्या. यावेळी आक्रमक झालेल्या काही आंदोलकांनी शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच खासदार सुळे यांना घेराव घातला. काहींनी पाण्याच्या बाटल्याही सुळे यांच्या कारकडे भिरकावल्या. अचानक घडलेल्या घटनेमुळे उपोषणस्थळी काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला.
जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा. मराठा आरक्षण आंदोलनाबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात यावी. गरज पडल्यास विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
मराठा समाजाला आरक्षण दिलं नसल्याने प्रचंड मोठी वेदना आहे. मुंबईत मराठा बांधवांची केवळ गर्दी झाली आहे, असे सरकारने समजू नये, तर वेदना समजावी. उद्यापासून पाणीही बंद करणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज राज्य सरकारला दिला. ते आझाद मैदानावर पत्रकार परिषदेत बोलत होते.