मुंबई : सात शाळकरी मुलीशी अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याची घटना मालाडच्या मालवणी परिसरात मंगळवारी सकाळी घडली. या प्रकरणी एका 36 वर्षांच्या आरोपीस मालवणी पोलिसांनी अटक केली आहे.
त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहेत. सर्व मुली चौदा ते पंधरा वयोगटातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
42 वर्षांची तक्रारदार महिला ही सांताक्रुझ येथे राहते. चौदा वर्षांची बळीत तिची मुलगी असून ती मालाडच्या मालवणीतील शाळेत शिकते. मंगळवारी सकाळी साडेसात वाजता ती नेहमीप्रमाणे शाळेत आली होती. यावेळी तिच्यासोबत इतर काही शाळकरी मुली होत्या. यावेळी तिथे आलेल्या एका 36 वर्षांच्या आरोपीने या मुलींना मिठी मारुन त्यांच्याशी अश्लील चाळे करुन विनयभंग केला होता.
तसेच तिथे दररोज भेटा, तुम्हाला गाडीवरुन फिरवतो असे सांगून त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारानंतर या मुलीने आरडाओरड केल्याने तिथे स्थानिक लोक जमा झाले होते. घडलेला प्रकार शाळकरी मुलींकडून समजताच त्यांनी मालवणी पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी बळीत मुलीच्या आईच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी दिडोंशीतील विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी मालाडच्या मालवणी परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांचा तपास एपीआय सिद्धार्थ दुधमल हे करत आहेत.